22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeराष्ट्रीयमोईत्रा यांची खासदारकी रद्द

मोईत्रा यांची खासदारकी रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पैसे घेऊन प्रश्न विचारल्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. मोईत्रा यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. आचारसंहिता समितीने या प्रकरणी अहवाल दिला होता. मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस समितीने केली होती. हा अहवाल आज लोकसभेत मंजूर झाला. त्यानंतर मोईत्रा यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले.

आचारसंहिता समितीच्या अहवालावर चर्चा करण्यास आणि महुआ मोईत्रा यांना त्यांची बाजू मांडण्याची मागणी लोकसभा अध्यक्षांनी फेटाळून लावली. समितीसमोर मोईत्रा यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळाली असल्याचे अध्यक्ष म्हणाले. तृणमूल काँग्रेसचे सदस्य कल्याण बॅनर्जी यांनी अहवालाच्या शिफारशीवर मतदान घेण्याआधी चर्चा करण्याची मागणी केली होती. अहवाल लोकसभेत सादर झाल्यानंतर सदनात गदारोळ झाला. यानंतर अध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेल्या राजेंद्र अग्रवाल यांनी सदनाचे कामकाज दुपारी २ पर्यंत तहकूब केले. पैसे घेऊन प्रश्न विचारल्याप्रकरणी खासदारकी गेल्यानंतर महुआ मोईत्रा यांनी नाराजी व्यक्त केली. माझे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याचा कोणताही अधिकार आचारसंहिता समितीला नाही, असे म्हटले. मी अदानी मुद्यावर भाष्य केल्याने माझे लोकसभेचे सदस्यत्व रद्द केले आहे. एथिक्स कमिटीसमोर माझ्याविरुद्ध कोणताही मुद्दा नव्हता, कोणताही पुरावा नव्हता. त्यांचा एकच मुद्दा होता की, मी अदानीचा मुद्दा उपस्थित केला होता, असा आरोप त्यांनी केला.

यापुढे संघर्ष करीत राहणार
या कोर्टात जे काही झाले, त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, हे सरकार अदानी यांना वाचवण्यासाठी काहीही करू शकते. मी आता ४९ वर्षांची आहे. पुढील ३० वर्षे मी संसदेबाहेर आणि संसदेच्या आत संघर्ष करत राहीन, असा निर्धार मोईत्रा यांनी बोलून दाखविला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR