22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रमहायुतीच्या काळात सावकारीने डोके वर काढले

महायुतीच्या काळात सावकारीने डोके वर काढले

अकोल्यात शेतक-याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

अकोला : अकोला जिल्ह्यात अवैध सावकारीच्या तक्रारीवरून छापा टाकून झाडाझडती घेण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोल्यात शेतीचा ताबा घेण्यास विरोध करणा-या तरुणाला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न सावकार आणि त्याच्या सहका-यांनी केला आहे. या धक्कादायक घटनेचा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आठवड्याभरापूर्वी घडलेल्या या घटनेचा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही निषेध नोंदवला असून महायुती सरकारच्या काळात अवैध सावकारीने पुन्हा डोके वर काढले असून ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतक-यांना त्रास देण्याचा प्रयत्न अवैध सावकारांकडून होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शेतक-यांचा सूड घेणा-या अवैध सावकारांवर सरकारने कडक कारवाई करावी. अपघात-ड्रग्ज प्रकरणातील आरोपी, गुंड, भ्रष्ट अधिका-यांना पाठीशी घालणा-या महायुती सरकारने राज्यातील शेतक-यांना छळणा-या सावकारांसोबत तरी सेटलमेंट करू नये!, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील मनब्दा गावात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. मनब्दा गावातील गतमने कुटुंबीय आणि सावकार मंगेश आणि निलेश शेळके यांच्यात शेतीच्या ताब्यावरुन वाद सुरु होता. हे प्रकरण न्यायालयात असतानाही सावकार मंगेश आणि निलेश शेळके यांनी गतमने यांना शेतजमिनीवर ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. तसेच संदीपचे वडील हरिभाऊ गतमने यांच्यावरही धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी तेल्हारा पोलीस ठाण्यात सावकारासह त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या धक्कादायक घटनेचा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सहकार विभागाकडे तक्रार करण्याची सूचना
अकोला जिल्ह्यात कर्जाची परतफेड करू न शकल्याने सावकारांकडून जमिनीवर ताबा मिळवण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अवैध सावकारीच्या तक्रारीवरून महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०२४ चे कलम १६ अंतर्गत छापेमारी करण्यात येत आहे. पथकांनी कारवाई करून सावकारांकडून आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली आहेत. तसेच असे काही प्रकार होत असल्यास सहकार विभागाकडे तक्रार करण्याची सूचना अधिका-यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR