इस्लामाबाद : पाकिस्तानातील संकटे थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. आधीच महागाईमुळे आर्थिक संकट आलेले असताना आता पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात न्यूमोनियाने कहर केला आहे. या भागात गेल्या तीन आठवड्यांमध्ये न्यूमोनियामुळे तब्बल २०० पेक्षा अधिक लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानच्या काळजीवाहू सरकारनेही या गोष्टीला दुजोरा दिल्याचे यात म्हटले आहे. सरकारने म्हटले आहे की, बहुतांश मुलांचा मृत्यू हा कुपोषणामुळे झाला आहे. सोबतच न्यूमोनियाची लस न मिळाल्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही अधिक आहे.
पाकिस्तानच्या बहुतांश भागात सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. यामुळे लहान मुलांना न्यूमोनियाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच लसही मिळाली नसल्यामुळे कित्येक मुलांची इम्युनिटी पॉवर कमी होत चालली आहे. ही परिस्थिती पाहून पाकिस्तानातील पंजाब सरकारने ३१ जानेवारीपर्यंत सकाळच्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानच्या लाहोर प्रांतात देखील न्यूमोनियामुळे ४७ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. या वर्षी एक जानेवारीपासून आतापर्यंत पाकिस्तानात न्यूमोनियाची तब्बल १०,५०० हून अधिक प्रकरणे समोर आली आहेत.
गेल्या वर्षीची परिस्थिती
गेल्या वर्षीदेखील पाकिस्तानमध्ये हिवाळ्यात अशीच परिस्थिती पहायला मिळाली होती. गेल्या हिवाळ्यात पाकिस्तानात तब्बल ९९० जणांचा न्यूमोनियाने बळी घेतला होता. सध्याची परिस्थिती पाहता पाकिस्तान सरकारने यातून काहीच धडा घेतला नसल्याचे दिसत आहे. सरकारने लोकांना मुलांची काळजी घ्यावी, स्वच्छता राखावी आणि त्यांना गरम कपडे घालावेत असे आवाहन केले आहे.