32.8 C
Latur
Monday, June 17, 2024
Homeसोलापूरराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षणार्थीचे संचलन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षणार्थीचे संचलन

सोलापूर : सोलापुरात पावसाची रिपरिप सुरू असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ३६० प्रशिक्षणार्थीचे संचलन शहरात पार पडले. या संचालनाच्या निमित्ताने सोलापूरकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात शिकवली जाणारी शिस्त व देशभक्ती वेगळ्या रूपाने अनुभवली. या संचालनामध्ये हरीभाई देवकरण येथे सुरू असलेल्या संघ शिक्षा वर्गाचे सर्वाधिकारी रवींद्र वंजारवाडकर, वर्ग कार्यवाह राहुल पुंडे, प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडगाव,सोलापूर शहराचे संघचालक राजेंद्र काटवे आदी सामील झाले होते.

अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व देशभक्तीपूर्ण वातावरणात निघालेल्या या संचलनाच्या सुरुवातीला स्वयंसेवकांच्या दोन वाहिन्या,त्यानंतर स्वयंसेवकांचे पहिले घोषपथक, त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भगवा ध्वज हातीघेऊन निघालेल्या स्वयंसेवकास चार ध्वज संरक्षकांचेसुरक्षाकडे, त्यानंतर पुन्हा स्वयंसेवकांच्या दोन वाहिन्या आणि त्यानंतर पुन्हा दुसरे घोषपथक व त्यामागे पुन्हा स्वयंसेवकांच्या दोन वाहिन्या अशा पद्धतीने या वर्गाच्या शिस्तबद्ध संचलनाची रचना करण्यात आली होती. सायंकाळी सहा वाजता प्रथमतः हरिभाऊ देवकरण प्रशाला येथून या संचलनास सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या भगव्या ध्वजास प्रणाम करून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या संचालनास सुरुवात झाली.

पारंपारिक वाद्यांच्या सुरेख, लयबद्ध तालात हे संचलन हरिभाई देवकरण प्रशाला ते सिद्धेश्वर मंदिर ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकमार्गे डफरीनचौक ते पटवर्धनचौक मार्गे कोनापुरे चाळ, जैन मेडिकल, कुमार चौकमार्गे वाडिया रुग्णालय ते पुन्हा पटवर्धन चौक, डफरीन चौक, मंगळवेढेकर इन्स्टिट्यूटमार्गे हरीभाई देवकरण प्रशालेत या संचालनाची सांगता झाली. या संचलनात सोलापूर शहरातील अनेक स्वयंसेवकांनी व्यवस्थेसाठी म्हणून सहभागी होत संचालन मार्गावरील अडथळे दूर करण्यासाठी सहाय्य केले.

संचालनास प्रारंभ होण्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे संचलन मार्गावरील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व डफरीन चौकातील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. या संचालनामध्ये ३६० प्रशिक्षणार्थी स्वयंसेवकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्ण गणवेश धारण केला होता. अतिशय शिस्तबद्ध निघालेल्या या संचलनामुळे शहरातून एक प्रकारे देशाच्या संरक्षण दलाचे संचलन होत असल्याची अनुभूती सोलापूरकरांना आली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे शिस्तबद्ध, देशभक्तीमय संचलन पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.डॉ. आंबेडकर चौकात हिंदुराष्ट्र सेना सोलापूरतर्फे संचालनाचे पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले. त्यानंतर डफरीन चौकात देखील नागरिकांनी मोठ्या उत्साहात पुष्पवृष्टी करत संचलनाचे स्वागत केले. त्यानंतर डॉ. हेडगेवार रक्तपेढी यांच्यावतीने संचलनावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR