19.2 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeमुख्य बातम्यामनोज जरांगेंची समजूत काढण्याच्या हालचाली

मनोज जरांगेंची समजूत काढण्याच्या हालचाली

मुंबई : प्रतिनिधी
मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अल्टिमेटमनंतर आता सरकारने जरांगे पाटील यांची समजूत काढण्याची रणनीती आखायला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणाच्या मोर्चाचे वादळ मुंबईवर धडकण्याआधीच राज्य सरकारकडून पडद्यामागे ब-याच हालचालींना सुरुवात झाली आहे. त्यासाठी पडद्यामागून चर्चा सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. बेमुदत उपोषणाच्या इशा-याच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांची मनधरणी करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: जरांगे पाटील यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांचा मान राखणार की आंदोलनावर ठाम राहणार, याबाबत उलटसुलट चर्चा रंगली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने मनोज जरांगे यांना आरक्षण देण्याबाबत शब्द देत आहेत. अनेकदा मुदतही मागून घेतली. परंतु प्रत्यक्षात त्यासंबंधी कुठलीही अंमलबजावणी केली गेली नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील नाराज आहेत. मात्र, अजूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगे पाटील यांच्या संपर्कात असून, मुंबईत धडकणारे मराठा वादळ रोखण्याच्या दृष्टीने त्यांनी पडद्यामागून प्रयत्न सुरू केले आहेत, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसमोर जरांगे यांना रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

जरांगे पाटलांच्या सध्याच्या भूमिकेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: पडद्यामागच्या चर्चेत सहभागी झाल्याचे सांगण्यात येत असून, राज्य सरकार सध्या आरक्षणासाठी काय काय प्रयत्न करीत आहे, हे जरांगे पाटलांना पटवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्र्यांकडून बच्चू कडू, उदय सामंत तर भाजपकडून गिरीश महाजन हे मनोज जरांगे यांच्या सातत्याने संपर्कात आहेत. या विषयावर मुख्यमंत्री तातडीची बैठक बोलवणार असल्याचेही बोलले जात आहे.

सरकारकडून नेमलेली शिंदे समिती तेलंगणाला जाऊन अभ्यास करणार आहे. कुणबी नोंदी, तेलंगणातील आरक्षण स्थिती यांचा अभ्यास समिती करणार आहे. मुख्यमंत्र्यांकडून अधिका-यांची एक विशेष आढावा बैठक घेतली जाणार आहे. आंदोलनाची धार कमी करण्याकरता एकीकडे पडद्यामागून सरकारच्या हालचाली सुरू असताना दुसरीकडे आंदोलनावेळी परिस्थिती चिघळू नये, याकरताही सरकार दक्ष आहे.

आरक्षण आढाव्यासाठी लवकरच विशेष बैठक
मराठा आरक्षणाकरिता प्रशासकीय पातळीवर सरकारची काय प्रगती आहे याचा आढावा घेण्याकरता एक विशेष बैठक स्वत: मुख्यमंत्री लवकरच सह्याद्री अतिथी गृहात बोलवणार आहेत. या बैठकीच्या माध्यमातून मराठा समाजाला सरकार काय काय प्रयत्न करत आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या माध्यमातून राज्य सरकार आरक्षणाच्या दिशेने जात आहे की नाही, विशेष अधिवेशनामध्ये कोणकोणते मुद्दे घेतले जातील, अशा विविध विषयांवर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

हरिभाऊ राठोड यांचा फॉर्म्यूला फेटाळला
आमच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यामुळे मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण मिळावे, हरिभाऊ राठोड यांच्या फॉर्म्युल्याप्रमाणे अर्ध्याच मराठ्यांना आरक्षण मिळणार असल्याचे सांगत मनोज जरांगे यांनी त्यांचा फॉर्म्युला नाकारला. ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी आज मनोज जरांगे यांची भेट घेतली आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा केली. अर्ध्या मराठ्यांना आरक्षण देऊन बाकीच्यांना मी अंगावर घेऊ का, असे म्हणत जरांगे यांनी राठोड यांचा फॉर्म्युला नाकारला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR