पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृ्त्वाखालील राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेले असतानाच मंगळवार दि. १६ जुलै रोजी आज आणखी एका भेटीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांचा ताफा आज पुण्यातील मोदीबागेतून बाहेर पडताना आढळून आला. याच मोदीबागेत शरद पवार यांचे निवासस्थान आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचं बोलले जात आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली होती. मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच इथे पवार विरुद्ध पवार असा सामना रंगल्याने या लढतीची राज्यभर मोठी चर्चा झाली. निवडणूक प्रचाराच्या काळात दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आल्याने पवार कुटुंबातील राजकीय संघर्ष चव्हाट्यावर आला होता. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांचा तब्बल १ लाख ५८ हजार मतांच्या फरकाने पराभव करत गड राखला. या पराभवानंतर अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांचं राजकीय पुनर्वसन करत त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आणि सुनेत्रा पवार या बिनविरोध खासदार झाल्या.
खासदार झाल्यानंतर आज प्रथमच सुनेत्रा पवार या मोदीबागेत दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या भेटीबाबत अद्याप सुनेत्रा पवार किंवा शरद पवार यांच्या गोटातून अधिकृतरीत्या कसलीही माहिती देण्यात आलेली नाही.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामतीत हायव्होल्टेज सामना रंगला होता. मागील तीन टर्मपासून खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांना कुटुंबातूनच आव्हान देण्यात आले होते. सुळे यांच्या भावजय सुनेत्रा पवार या निवडणूक रिंगणात होत्या. पण बारामतीकरांनी पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांच्यावरच विश्वास टाकत त्यांनाविजयी केले.
राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीलाच पराभवाचा धक्का बसल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा पुढील राजकीय प्रवास कसा असणार, याबाबत चर्चा सुरू असतानाच त्यांचे नाव राज्यसभेच्या पोटनिवडणुकीच्या उमेदवारीसाठी चर्चेत आले. मात्र राष्ट्रवादीतील इतर नेतेही या जागेसाठी इच्छुक असल्याने नक्की कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत सस्पेन्स होता. अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावरच शिक्कामोर्तब केले आणि सुनेत्रा यांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा झाला.