लातूर : एजाज शेख
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयद्वारा आयोजित ६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२३-२४ ची प्राथमिक फेरीत लातूर केंद्रावर येथील मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृति सभागृहात दि. १६ डिसेेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता सूर्याेदय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, लातूर निर्मित अॅड. शैलेश गोजमगुंडे लिखीत आणि नवलाजी जाधव दिग्दर्शित ‘मुक्ती’ हे दोन अंकी नाटक सादर करण्यात आले. या नाटकाला नाट्यरसिकांची उदंड प्रतिसाद दिला.
स्व. जी. ए. कुलकर्णी यांच्या कथेवर आधारीत ‘मुक्ती’ या दोन अंकी नाटकाचे लेखन अॅड. शैलेश गोजमगुंडे यांनी केलेले आहे. लेखन आणि अभिनय या दोन गोष्टींमध्ये एक घट्टनाते असते. ते नाते जपण्याचा लेखकाने जाणिवपूर्वक प्रयत्न केला आहे. सामाजिक जीवनात अनेक प्रसंग घटत असतात. आपल्या आवतीभोवती घडणा-या घटनांचे प्रतिबंब आपले जितके आयुष्य असते त्यात दिसत असतात. माणसांच्या मनपटलावर त्याचा सकारात्मक, नकारात्म परिणाम होत असतो. त्यातूनच अनेक -हस्यमय घटना घडत असतात. मृत्यूत मुक्ती नाही तर या जगण्याच्या ऋणातच मुक्ती आहे, असा संदेश देत मुक्ती हे नाटक नाट्यरसिकांना खिळवून ठेवते.
रंगदेवतेला अभिवादन करुन पडदा उघडतो आणि नियतीचा खेळ सुरु होतो. कृष्णा मुसळे याने नियतीचा खेळ अत्यंत कौशल्याने मांडला. आचार्य महेश पवार यांनी शिवांगला शाप देताना जी अभिनयाची चुनूक दाखवली ती अद्वितीय होती. प्रा. नवलाजी जाधव याने शिवांग या अस्पृश्य धनुर्धराची भुमिका खुबीने रंगवली. गुरुकन्येची भुमिका डॉ. स्वप्नाली यादव हिने साकारली. तिचे अभिनय कौशल्य नाट्यरसिकांना भावले. मंजूषत्त पाठक यांनी शिवांगच्या आईची भूमिका खुप ताकदीने उभी केली. प्रा. ज्योतिबा बडे यांनी बैरागी म्हणून भुमिकेला पुर्ण न्याय दिला. रवी सावंत (राजपुत्र-१), रुद्रप्रताप जटाळ (राजपूत्र-२), यशोदीप कांबळे, पृथ्वीराज चव्हाण, शैलेश सूर्यवंशी, सागर शिंदे (वृंद) यांनी आपापल्या भूमिका चांगल्याप्रकारे निभावल्या.
संहितेचे वाचन, संवादाची उजळणी, कसदार अभिनय हे या नाटकाच्या जमेच्या बाजू ठरल्या. दिग्दर्शक प्रा. नवलाजी जाधव यांनी संहितेच्या गरजेनूसार अफलातून नवनवीन क्लुप्त्या वापरल्याचे दिसून आले. लक्ष्मण वासमोडे, अॅड. बालाजी म्हेत्रे यांचे नेपथ्य उत्कृष्ट होते. रंगमंचाच्या मधोमध लेव्हलचा केलेला वापर आणि त्यामागचे गुढ चित्र नाटकाला एका उंचीवर नेणारे ठरले. सुधीर राजहंस यांची प्रकाश योजना उत्तम होती. तन्मय रोडगे यांचे संगीत संयोजन खुपच बोलके होते. सचिन उपाध्ये, स्मिता उपाध्ये यांची रंगभूषा, वेशभूषा त्या-त्या पात्रांची व्यक्त्तीरेखा ठळकपणाने सांगणारी होती. लखन देवणीकर यांचे व्यवस्थापन उत्तम होते. दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेशभूषा यावर केलेली मेहनत प्रकर्षाने जाणवली.