न्यूयार्क : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने न्युयॉर्क येथे निधन झाले.
अमोल क-हाडकर यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार अमोल काळे यांनी रविवार ९ जून रोजी टी २० वर्ल्ड कपमधील न्युयॉर्कला झालेला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना स्टेडियममध्ये जाऊन पाहिला होता. त्यांच्यासह एमसीएचे काही अधिकारी देखील होते. सध्या चालू असलेला टी २० वर्ल्ड कप वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे होत आहे. भारताचे पहिल्या फेरीतील सामने अमेरिकेत होत आहेत. त्याचमुळे अमोल काळे हे न्युयॉर्कमध्ये असल्याचे समजते. दरम्यान, त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर देशभरातून शोक व्यक्त होत आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही शोक व्यक्त केला आहे.
त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनाची दु:खद बातमी समजली. ते चांगले आयोजक आणि क्रिकेट चाहते होते. अमोल, जगाचा निरोप घेण्याचे वय तुझे नव्हते. माझ्यासाठी हा वैयक्तिक नुकसान आहे.