32 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबईतील वाईन शॉप रात्री १ वाजेपर्यंत तर, बार पहाटे ५ वाजेपर्यंत उघडे राहणार !

मुंबईतील वाईन शॉप रात्री १ वाजेपर्यंत तर, बार पहाटे ५ वाजेपर्यंत उघडे राहणार !

मुंबई : (प्रतिनिधी) नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या मद्यपींवर सरकार मेहेरबान झाले आहे. ३१ डिसेंबरला मुंबईतील वाईन शॉप मध्यरात्री १ वाजेपर्यंत, तर बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची अनुमती देण्यात आली आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील किरकोळ, विदेशी मद्य विक्रीच्या दुकानांना बंद करावयाच्या वेळेत शिथिलता देण्यात आली आहे.

ही शिथिलता ३१ डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेपासून ते दुस-या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत असणार आहे. म्हणजेच वाईन शॉप १ वाजेपर्यंत उघडे राहणार आहेत.कोविडच्या संकटामुळे दोन वर्ष घरात बसावे लागलेल्या लोकांच्या उत्साहाला उधाण आले असून, सगळेच सणवार, वेगवेगळे डेज जल्लोषात साजरे करण्याची स्पर्धाच लागली आहे. नवीन वर्षाच्या स्वागताचीही जोरदार तयारी सुरू आहे. निवडणुकीचे वर्ष असल्याने सर्व वर्गाला खुश करण्यात सत्ताधारी मंडळी मग्न आहे. लोकांच्या उत्साहाला आणखी कैफ यावा यासाठी सरकारने मद्यालयांनाही ३१ डिसेंबरला खुली सुट दिली आहे. वाईनशॉप रात्री एक वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. तर बिअरबार,परमिटरूम पहाटे पाच वाजेपर्यंत उघडे ठेवण्यास परवानगी मिळाली आहे.

तसेच क्लब अनुज्ञप्ती व परवाना कक्ष यांना पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त रात्री साडेअकरा ते दुस-या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत आणि पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी रात्री दीड ते दुस-या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत शिथिलता असेल. सीएल -३ अनुज्ञप्ती यांना महानगरपालिका तसेच ‘अ’, व ‘ब’ वर्ग नगरपालिका क्षेत्रातील अनुज्ञप्तींसाठी रात्री ११ ते दुस-या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत व इतर ठिकाणी रात्री १० ते दुस-या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत शिथिलता असणार आहे. ही वेळेची शिथिलता ३१ डिसेंबर रोजी असेल, असे आदेशान्वये मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी कळविले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR