मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस-१७’ या कार्यक्रमाचा मुनव्वर फारुकी हा विजेता ठरला आहे. मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार आणि मन्नार चोप्रा हे ‘बिग बॉस-१७’ या कार्यक्रमाचे टॉप-३ स्पर्धक ठरले. यापैकी मुनव्वर फारुकीने ‘बिग बॉस-१७’या कार्यक्रमाच्या ट्रॉफीवर नाव कोरले आहे. सलमान खानने मुनव्वर फारुकीला ‘बिग बॉस-१७’ या कार्यक्रमाची ट्रॉफी दिली. मुनव्वरला ५० लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. तसेच त्याला एक कार देखील मिळाली आहे.
रात्री उशीरा ‘बिग बॉस-१७’ या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले पार पडला. मुनव्वर हा ‘बिग बॉस-१७’ या कार्यक्रमाचा महाविजेता ठरला आहे. मुनव्वरचा आज वाढदिवस आहे. मुनव्वरसाठी त्याचा हा वाढदिवस खास ठरला आहे, कारण त्याला ‘बिग बॉस-१७’ ची ट्रॉफी मिळाली आहे.
मुनव्वर फारुकी हा स्टँडअप कॉमेडियन आहे. तो विविध शहरांमध्ये जाऊन स्टँडअप कॉमेडी करतो. मुनव्वर त्याच्या विनोदी शैलीने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकत असतो. अनेक वेळा मुनव्वर हा त्याच्या स्टँडअप कॉमेडीच्या शोमध्ये केलेल्या विनोदांमुळे वादाच्या भोव-यात अडकला होता.
लॉक-अप या शोमुळे मुनव्वरला विशेष लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमाचा तो विजेता ठरला होता. ७० दिवस मुनव्वर हा लॉक अप कार्यक्रमामध्ये होता. हा कार्यक्रम जिंकल्यानंतर मुनव्वरला ट्रॉफी, २० लाख रुपयांचे रोख पारितोषिक, गाडी हे मिळाले. तसेच त्याला इटलीच्या सहलीवर जाण्याची संधी देखील मिळाली आहे.
मुनव्वरने लॉकअप या शोमध्ये सांगितले होते की त्याच्या आईचा मृत्यू अॅसिड प्यायल्याने झाला होता. तो म्हणाला होता, जानेवारी २००७ मध्ये ही घटना घडली. माझ्या आजीने मला सांगितले होते की माझ्या आईची तब्येत ठिक नाहीये. पोटादुखीमुळे मी माझ्या आईला ओरडताना पाहिले होते. मी माझ्या आईला डॉक्टरांकडे घेऊन गेलो. तेव्हा कळाले की, माझ्या आईने अॅसिड प्यायले होते. तेव्हा मी तिचा हात पकडला होता. डॉक्टर मला म्हणाले की त्यांचा हात सोडून दे कारण त्यांचे निधन झाले आहे. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की, माझ्या आईने सात ते आठ दिवस जेवण देखील केले नव्हते.