कोरेगाव भीमा : एकीकडे अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे संबंध, तर दुसरीकडे दुस-या मुलीशी लग्न करण्याची तयारी, यातून दोघांत घडलेल्या वादातून मुलीचा मित्राच्या मदतीने खून करून तिचा मृतदेह दिवेघाटात टाकून दिला. ५६ दिवस मुलगी बेपत्ता असल्याने पोलिस व नातेवाईकही हैराण होते. अखेर खुनाचा उलगडा झाला आणि लोणीकंद पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. ही घटना फुलगाव येथे घडली.
लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी रामराव हिंगे (२५) व त्याचा मित्र सचिन संजय रणपिसे (२६, दोघेही रा. फुलगाव) यांना अटक करण्यात आली आहे. बालाजी याचे अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध होते. तरी बालाजी हा दुस-या मुलीशी लग्न करण्याच्या तयारीत होता. दोन महिन्यांपूर्वी संबंधित मुलगी व बालाजी बरोबर बाहेर गेले. त्यांचा वाद झाल्याने त्याने तिचा सरळ खूनच केला. मुलगी बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी दोन नोव्हेंबर २०२४ रोजी पोलिसांत तक्रार दिली. पोलिस व नातेवाईक दोन्ही शोध घेत होते. मात्र, तिचा तपास लागत नव्हता. यामुळे सर्वच हैराण होते. सर्व बाजूंच्या तपासानंतर ५६ दिवसांनी त्या मुलीचा खून झाल्याचा व मृतदेह दिवे घाटात टाकल्याचा सुगावा लागला. दोघांनाही ताब्यात घेत पोलिसांनी मृतदेह शोधला.
२८ डिसेंबर रोजी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ही घटना कळताच फुलगावमधील ग्रामस्थ हादरले. त्यांनी हळहळ व्यक्त केली. गुन्हा उघडकीस आणण्याची ही कामगिरी परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव, सहायक पोलिस आयुक्त प्रांजली सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी कंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव कुंभार, तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र गोडसे व त्यांच्या पथकाने केला. दरम्यान, हत्या झालेल्या त्या मुलीची शोकसभा गुरुवारी सुरू असताना संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अचानक आळंदी रस्त्यावर येत रास्ता रोको करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणीचे निवेदन पोलिसांना दिले.