सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यात तेलगाव भीमा येथे झोपेत असलेल्या पत्नीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली. भाग्यश्री बसवराज कोळी असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.याप्रकरणी पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत चंद्रकांत कोळी यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी पती बसवराज आडव्याप्पा कोळी, शिवानंद आडव्यापा कोळी व गजानन आडव्याप्पा कोळी (सर्व रा. तेलगाव) या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तेलगाव येथील आरोपीचा भाग्यश्रीसोबत २०१४ साली विवाह झाला होता. मागील दोन वर्षांपासून आरोपीचे कुटुंब निम्बर्गीतील शेतात राहत होते. काही दिवसांपूर्वी सासरवाडी लोणी येथे जाऊन आरोपी हा पत्नी काही काम करत नाही, ऐकत नाही, नेहमी भांडत असल्याचे सांगत होता.
आरोपी पतीने मेव्हणा चंद्रकांत कोळी याला तेलगाव येथे बोलविले. तुझ्या बहीणीचे चारित्र चांगले नाही. तिचे निंबर्गी येथील एकासोबत संबंध आहे, असे सांगितले. रात्री जेवण करून झोपल्यानंतर आरोपीने डोक्यात दगड घालून झोपेतच पत्नीचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास मंद्रूपचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले करीत आहेत.
फिर्यादी हे भाऊ आणि मामा यांना घेऊन तेलगाव येथे गेले. आरोपीच्या भावाने तिचा खून झालेली जागा दाखविली. त्या ठिकाणी तिच्या बांगड्यांचे तुकडे पडलेले दिसले. बहिणीच्या डोक्यात दगड घातल्यानंतर तिच्या अंथरुणाखाली फरशी फुटून खड्डा पडलेला दिसत होता. फिर्यादीच्या भावजीने आणि त्यांच्या भावांनी बहिणीचे रक्ताने माखलेले कपडे, अंथरूण पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने जाळून टाकल्याचे फिर्यादी म्हटले आहे.