25.5 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeसोलापूरमेव्हण्याच्या गर्भवती पत्नीचा खून करणाऱ्या नराधमास जन्मठेपेची शिक्षा

मेव्हण्याच्या गर्भवती पत्नीचा खून करणाऱ्या नराधमास जन्मठेपेची शिक्षा

सोलापूर : मेहुण्यावर खुनी हल्ला करून त्याच्या गर्भवती पत्नीचा खून करणाऱ्या नराधमांना जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय ए राणे यांनी कठोर शिक्षा सुनावली. खून केल्याप्रकरणी जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा तर खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी १० वर्षाचा कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

महेंद्र सुभान भोसले (वय २३, रा. जामगाव बुद्रुक, ता. मोहोळ, जि. सोलापूर) असे जन्मठेप झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर महेर उर्फ मयुर रामा भोसले (वय २४, रा. जामगाव बुद्रुक, ता. मोहोळ) असे १० वर्षाचा कारावासाची शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणातील बाळासाहेब सुभान भोसले हा आरोपी अद्यापही फरार आहे. शितल अर्जुन काळे (वय २२, रा. अरबळी, ता. मोहोळ) असे खून झालेल्या गर्भवती महिलेचे नाव आहे. याबाबत अर्जुन समाधान काळे (वय २५, रा. अरबळी, ता. मोहोळ) याने दिलेल्या फिर्यादीवरुन कामती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यातील जखमी अर्जुन काळे व मयत शितल काळे हे दोघे पती-पत्नी होते. ते दोघे अरबळी येथे राहत होते तर अर्जुन काळेचे आई-वडील हे बेगमपूर येथे राहतात. अर्जुनची मोठी बहिण माया हीचा जामगाव येथील आरोपी महेंद्र भोसले याच्याबरोबर विवाह झाला होता. लग्रानंतर तिला एक मुलगी झाली. सासरची मंडळी मायाचा छळ करीत असल्याने माया ही तिच्या आई वडीलांकडे राहण्यास होती. माया हिने नांदण्यास यावे म्हणून आरोपी महेंद्र हा हट्ट करीत होता तर महेंद्र व बाळासाहेब हे दोघे सतत भांडण करीत होते. परंतु, माया घरी नांदायला जायला तयार नव्हती. त्यामुळे महेंद्र व इतर आरोपी हे चिडून होते.

घटनेदिवशी म्हणून २० एप्रिल २०२० रोजी रात्री अर्जुन काळे, त्याची पत्नी शितल व त्यांची दोन मुले ही शेतातील वस्तीवर झोपले असताना महेंद्र भोसले, त्याचा भाऊ महेर भोसले, बाळासाहेब भोसले हे तिघेजण आले व त्यांनी अर्जुन यास माया कुठे आहे असे विचारले. त्यावेळी ती माझ्याजवळ राहात नसल्याचे सांगितल्यानंतर तिघांनीही जांबियाने अर्जुनवर हल्ला करून त्यास जखमी केले. त्यावेळी अर्जुनची पत्नी शितल ही सोडवासोडवी करण्यासाठी मध्ये गेली असता आरोपींनी जांबियाने शितलवर वार केले.

शितल ही गर्भवती असतानाही पोटात चाकू भोसकून वार केल्याने ती जागीच मृत झाली. यावेळी आरोपींनी अर्जुनची मुलगी जानू हिच्यावरदेखील वार करून तिला जखमी केले. यावेळी आरडाओरड ऐकून शेजारील लोक घटनास्थळी आले व त्यांनी जखमी आणि मयतांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. शितल हिस डॉक्टरांनी मृत घोषित केले तर जखमी अर्जुन व मुलगी जानू यांच्यावर उपचार सुरु होते. याबाबत कामती पोलिस ठाण्यात खून व खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी महेंद्र भोसले, बाळासाहेब भोसले, सुभान भोसले यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक उंदरे व अंकुश माने यांनी तपास करून आरोपींना अटक केली व न्यायालयात दोषारोपपत्र पाठवून दिले.

या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश राणे यांच्यासमोर झाली. याप्रकरणी सरकारी पक्षाच्यावतीने ११ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षी व सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्रा धरून न्यायाधीश राणे यांनी आरोपी महेंद्र भोसले यास खूनप्रकरणी जन्मठेप व दंडाची शिक्षा तर खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी महेर भोसले यास १० वर्षे कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. तर सुभान भोसले यास मुक्त केले.

याप्रकरणी सरकारच्यावतीने जिल्हा सरकारी वकिल प्रदीपसिंग राजपूत यांनी तर आरोपींच्यावतीने अ‍ॅड. बायस, अ‍ॅड. अजमोद्दीन शेख यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार जाधव यांनी तर साक्षीदार हजर ठेवण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक डी व्ही उदार यांनी सहकार्य केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR