नागपूर : प्रतिनिधी
जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना आरमार स्थापन करायचे होते, तेव्हा सिंधूबंदी म्हणजेच समुद्र ओलांडल्याने पाप लागते या भावनेतून हिंदू सैनिक समुद्रात जायला तयार झाले नाही. अशा वेळेस मुस्लीम सैनिकांनी साथ दिली आणि मुस्लीम मावळ्यांच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचा भगवा झेंडा समुद्रात फडकावला, असे वक्तव्य दंगल मुक्त महाराष्ट्र या संघटनेचे संयोजक शेख सुभान अली यांनी केले आहे. तर सुभान अली यांच्या वक्तव्यानंतर मनसे आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
नागपुरात काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार मोतीराम मोहाडीकर यांच्या समर्थनार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत शेख सुभान अली बोलत होते. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे 31 सुरक्षारक्षक होते. त्यापैकी २० सुरक्षारक्षक मुस्लीम होते. म्हणजेच शिवाजी महाराज यांनी स्वत:च्या सुरक्षेची जबाबदारी मुस्लीम मावळ्यांना दिली होती, शेख सुभान आली यांनी म्हटले आहे.
स्वराज्याचा पहिला सरन्यायाधीश मुस्लीम
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सव्वा लाख सैन्य होते. त्याचा कमांडर नुर खान बेग हा मुस्लीम होता. शिवाजी महाराजांचा गनिमीकावा ज्या घोडदलावर अवलंबित होता, त्या घोडदलाचा कमांडर सिद्धी हिलाल हा देखील मुस्लीम होता आणि त्या घोडदलात ५८ हजार घोडसवार देखील मुस्लीम होते. महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख एक मुस्लीम इब्राहिम खान होता. तर छत्रपतींचा कायदेशीर सल्लागार व खाजगी सचिव मौलाना काझी हैदर हा ही मुसलमान होता. त्याच काझी हैदरला शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पहिला सरन्यायाधीश बनवले होते, असे सुभान अली म्हणाले.
महाराज मुस्लीमांचे शत्रू होते, असे का बिंबविले गेले
तुकाराम महाराज आणि जिजाऊ यांच्या व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे इतर ही काही गुरु होते. रत्नागिरी येथील संत याकुत बाबा या मुस्लिम संतांना शिवाजी महाराज यांनी त्यांचे गुरु मानले होते. नंतरच्या काळात तिथे मशिदसाठी महाराजांनी याकुत बाबांना ६५३ एकर जागा ही दिली होती. एवढे सर्व असताना शिवाजी महाराज मुस्लीमांचे शत्रू होते, असे का बिंबविले गेले? असा सवालही सुभान अली यांनी उपस्थित केला आहे.