मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निकाल आमच्याच न्यायालयाने दिलेल्या निकालाशी विसंगत नाही का असा सवाल आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी उपस्थित केला. यावरून ठाकरे गटाने राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. मात्र, आपण दिलेला निर्णय १०० टक्के सर्वोच्च न्यायालयाच्या निकषानुसारच असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.
या प्रकरणाच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकर यांच्यापुढे सादर करण्यात आलेले मूळ दस्तावेज मागवून घेतले आहेत. मूळ पक्ष कोणता हे ठरविताना विधिमंडळातील बहुमताची तुलना पक्ष संघटनेतील बहुमताशी करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्याचे ठाकरे गटाने निदर्शनास आणून दिले. पक्षात फूट पडल्यानंतर ख-या पक्ष विधिमंडळ पक्षाची ओळख बहुमतातून ठरते, असे राहुल नार्वेकरांनी म्हटले होते. त्यावर न्या. चंद्रचूड यांनी प्रश्नचिन्ह लावले. प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली.
सर्वोच्च न्यायालयाला जर हे पटले असते की, मी दिलेला निर्णय त्यांनी दिलेल्या निर्णयाच्या विरुद्ध आहे, तर त्यांनी ऑर्डर केली असती. मी दिलेला निर्णय हा १०० टक्के सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकषानुसारच आहे. केवळ एखादी विशिष्ट ओळ घ्यायची, संपूर्ण निकाल पाहायचा नाही. सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की, या विषयात खोलात जाऊन विचार करायची गरज आहे. अध्यक्षांचा निर्णय चुकीचा आहे असे सर्वोच्च न्यायालयाने कधीच म्हटले नाही असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.
घटनेची पायमल्ली?
विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या आमदारांना पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्र ठरवायला हवे होते. पण, त्या घटनेची पायमल्ली करून राहुल नार्वेकर यांनी त्यांना पात्र ठरवले. विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर शिवसेना शिंदे गटाचीच असा निर्णय देऊन राहुल नार्वेकर यांनी स्वत:चे हास्य करून घेतले. विधिमंडळाच्या बहुतामताच्या आधावर पक्ष कोणाचा आहे हे ठरत नाही. पक्षातल्या संघटनेत बहुमत कोणाचे आहे, यावरून ठरतो, या शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली.