मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करुन शरीराचे १५ तुकडे केले आणि ड्रममध्ये भरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. या घटनेनंतर आता मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमील एका व्यक्तीला त्याच्या हत्येची भीती सतावत आहे.
अमित कुमार सेन नावाच्या तरुणाने आरोप केला आहे की, त्याच्या पत्नीचे अनेक बॉयफ्रेंड आहेत आणि ती त्यापैकी एकासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. अमितने याला विरोध केला असता पत्नीच्या प्रियकराने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.
ग्वाल्हेरच्या मेहंदीवाला सय्यद भागात राहणा-या अमित सेनच्या पत्नीचे लग्नानंतरही अनेक बॉयफ्रेंड होते. सध्या ती राहुल बाथम नावाच्या व्यक्तीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असून, तिच्या लहान मुलालाही सोबत घेऊन गेली आहे. अमितचा आरोप आहे की, त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून मोठा मुलगा हर्षचा खून केला आहे. तसेच, त्याला आपल्या हत्येची संशयदेखील आहे.
पोलिसांनी ऐकले नाही, मुख्यमंत्र्यांना आवाहन
अमितने अनेकवेळा पोलिसांकडे तक्रार केली, पण कारवाई झाली नाही. नाराज होऊन तो ग्वाल्हेरमधील फूलबाग चौकात मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या पोस्टरखाली धरण्यावर बसला. त्याने मुख्यमंत्र्यांना सुरक्षेसाठी आवाहन केले असून लवकर कारवाई झाली नाही, तर मेरठच्या ड्रम घटनेप्रमाणे माझीही हत्या होऊ शकते, असा संशय व्यक्त केला आहे.
पोलिस काय म्हणतात?
या प्रकरणी जनकगंज पोलिस ठाण्याचे प्रभारी सांगतात की, अमित कोणतीही तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आलेला नाही. त्याने यापूर्वी अर्ज दिला असेल, तर त्यावर कारवाई केली जाईल. तर, अमित सांगतो की, त्याने अनेकवेळा पोलिसांची मदत मागितली, पण कोणतीही सुनावणी झाली नाही.