निलंगा ( प्रतिनिधी ) :
तालुक्यातील औराद शाहजनी येथे आज दि २७ मार्च बुधवार रोजी दुपारी १२.१५ मिनिटाला भूगर्भातून खूप मोठा आवाज झाला . यामुळे नागरिक भयभीत झाले . या भूगर्भातील गुढ आवाजाची २.०६ रिश्टर स्केलचा सौम्य भूकंपाचा धक्का बसला असल्याचे प्रशासनाकडे नोंद झाली आहे. या भूकंपाच्या धक्क्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र भूकंपाच्या सौम्य धक्क्याने जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की , निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे आज दिनांक २७ मार्च रोजी दुपारी १२.१५ मिनिटाला भूगर्भातून खूप मोठा आवाज झाला यामुळे नागरिक भयभीत होऊन रस्त्यावर आले प्रत्येक नागरिकाला हा आवाज माझ्याच बाजूला झाला आहे असे वाटत असल्याचे नागरिकांतून चर्चिले जात आहे. भूकंपाच्या या सौम्य धक्क्याची २.६ रिश्टर स्केलची येथील ग्रामपंचायत कार्यालयात बसवण्यात आलेल्या भूकंप मापक यंत्रात नोंद झाली असल्याचे भूगर्भशास्त्रज्ञ अजयकुमार वर्मा दिल्ली यांनी वेब साईट वर जाहीर केले आहे.
सदर भूकंपाचा केंद्रबिंदू लातूरच्या जवळ गंगापूर असल्याचेही भूगर्भशास्त्रज्ञ अजयकुमार वर्मा यांनी वेबसाईटवर टाकले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
भूकंपाच्या या सौम्य धक्क्याने औराद शहाजानीसह तगरखेडा ,शेळगी ताडमुगळी परिसरात भूगर्भातून आवाज झाला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र या भूकंपाच्या धक्क्याने जीवित व वित्तहानी झाली नाही.
औराद शहाजानी सह परिसरात झालेल्या भूकंपामुळे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील किल्लारी येथे १९९३ सली झालेल्या महाप्रलयंकारी भूकंपाच्या आठवणी औरादकरांना आठवत होत्या . तसेच निलंगा तालुक्यातील हासोरीसह परिसराला बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याची घटना घडली असतानाच औराद शहाजानी सह परिसराला भूकंपाचा धक्का बसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत .
नागरिकांनी घाबरून जाऊ नये : तहसीलदार
याबाबत तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्याशी विचारणा केली असता ते म्हणाले की, याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्याशी विचारणा केली आहे . निवडणुकीच्या कामात असल्याने दुपारी भेट दिली नाही. मात्र सायंकाळी औराद शहाजानी येथे जाऊन नागरिकांनी घाबरून जाऊ नये. प्रशासन आपल्यासोबत आहे. असे नागरिकांना आवाहन करण्यात येणार असल्याचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी एकमतशी बोलताना सांगितले. यावेळी मंडळाधिकारी आर एस मिरजगावकर , तलाठी बालाजी भोसले आदी उपस्थित होते.