22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रलोकसभेसाठी भाजपकडून बड्या नेत्यांची नावे

लोकसभेसाठी भाजपकडून बड्या नेत्यांची नावे

पंकजा मुंडे, आशिष शेलार , सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन यांच्या नावाची चर्चा

मुंबई : भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रातील २५ जागांवर चर्चा झाली. महत्त्वाची बाब म्हणजे, राज्यातील काही मोठ्या चेह-यांना लोकसभा निवडणूक लढवावी लागण्याची शक्यता आहे.

यामध्ये आशिष शेलार, चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा आहे. यापैकी काही नेते फारसे उत्सुक नसल्याचे कळतेय. मात्र, पक्षाचा आदेश आलाच तर लोकसभा लढवण्यावाचून कुठलाही पर्याय या नेत्यांसमोर नसणार आहे.

सध्या भाजपच्या गोटातील वातावरण उलट्या प्रवाहात सुरू आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सहसा निवडणुकांमध्ये तिकिट मिळवण्यासाठी इच्छुक नेते अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात. हवं ते करण्यासाठी तयार होतात, त्याबदल्यात फक्त तिकिट द्या, एवढीच अपेक्षा ठेवतात. मात्र, महाराष्ट्रातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मात्र काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील भाजप नेते लोकसभेसाठी तिकिट मिळू नये यासाठी प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपच्या काही नेत्यांची लोकसभेत खासदार म्हणून निवडून जाण्याची अजिबात इच्छा नाही. त्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये अनेक नेत्यांची नावं चर्चेत आहेत.

सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडे यांसारख्या नेत्यांना पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत सुधीर मुनगंटीवारांनी तर थेट जाहीरपणे माझं तिकीट कापलं जावं यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करतोय, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना जोरदार उधाण आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार आशिष शेलारांनाही लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी सांगण्यात आले आहे. पण, आशिष शेलारांनाही लोकसभा लढवण्यात फारसा रस नसल्याचे कळतेय. तर, केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणेंनादेखील भाजप हायकमांडकडून लोकसभा लढवण्यासाठी सांगण्यात आले, मात्र नारायण राणेंनी नाही न म्हणता, थेट प्रमोद जठारांचं नाव सुचवल्याची माहिती मिळत आहे.

याव्यतिरिक्त महाराष्ट्र भाजपचे संकटमोचक अशी ख्याती असलेले गिरीश महाजनांचेही यामध्ये नाव आहे, मात्र महाजनांनी देखील लोकसभा निवडणूक लढवण्यास थेट नकार दिला. तसेच, विनोद तावडेंनाही लोकसभा लढवण्यास सांगितले होते, पण तावडेंनी हरियाणा आणि बिहारची जबाबदारी माझ्याकडे असल्याचे कारण पुढे करत लोकसभा लढवण्यास नकार दिल्याचे कळते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR