छत्रपती संभाजीनगर : नॅशनल फेडरेशन ऑफ टेलिकॉम एम्प्लॉइज ही बी एस एन एल कर्मचारी संघटना दि. १३ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी देशभर निषेध सप्ताह पाळून आपल्या मागण्यांकडे सरकारचे व व्यवस्थापनाचे लक्ष वेधनार आहेत. एन एफ टी इ ने पुकारलेल्या या आंदोलनात कर्मचा-यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन एकजुटीने प्रयत्न करावेत असे आवाहन संघटनेचे राज्य अध्यक्ष कॉम चंद्रप्रकाश जगताप, सचिव कॉम रंजन दाणी, कोषाध्यक्ष कॉम शिवाजी चव्हाण, राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम दीपक जाधव तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सचिव भान सिंग पोहल, अध्यक्ष मुकेश शिंगाडे, व कोषाध्यक्ष नंदू पाटील, श्रीमती मीरा भुजांगे यांनी केले आहे.
संघटनेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बी एस एन एल मधील कर्मचा-यांचे प्रश्न अत्यंत तीव्र झालेले आहेत. गेल्या १७ वर्षांपासून या कर्मचा-यांना वेतन करार मिळालेला नाही. कर्मचा-यांना मिळणा-या इतर भत्त्यामधे गेल्या २२ वर्षांपासून कोणतीही वाढ दिलेली नाही. आऊटडोअर मेडिकल बिलाच्या खर्चासाठी निवृत्त कर्मचा-यांना रोखीने पेमेंट केले जाते. मात्र कामावर असलेल्या कर्मचा-यांना ही सुविधा दिली जात नाही. गेल्या चार वर्षांपासून या विभागातील अनुकंपा भरती बंद करण्यात आली असून मृत कर्मचा-यांची शेकडो कुटुंब हलाखीचे जीवन व्यतीत करत आहेत. त्यांना एकरकमी भरपाई सुध्दा दिली जात नाही. अधिका-यांना दर पाच वर्षांनी मिळणारे प्रमोशन कर्मचा-यांना मात्र ७ ते ८ वर्षानंतर दिले जाते. वेतन करार व नवीन प्रमोशन पॉलिसी दिली जात नसल्याने आज बी एस एन एल मधील क आणि ड वर्गातील हजारो कर्मचा-यांची वार्षिक वेतनवाढ देखील बंद आहे. वर्षानुवर्षे एकाच बेसिकवर काम करत असल्याने कर्मचा-यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहेत.
अशा अनेक समस्या सांगत संघटनेने संताप व्यक्त केला असून यासाठी पंतप्रधानांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. एकूणच कर्मचा-यांच्या न्याय हक्कांकडे सरकारचे व व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. १३ फेब्रु ते १७ फेब्रुरीपर्यंत देशपातळीवर लक्षवेधी निषेध सप्ताह पाळण्यात येत आहे.