27.1 C
Latur
Thursday, June 27, 2024
Homeमनोरंजनअशोक सराफ, रोहिणी हट्टंगडी यांना नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

अशोक सराफ, रोहिणी हट्टंगडी यांना नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

मुंबई : मराठी नाट्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणा-या कलाकारांचा दरवर्षी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने गौरव केला जातो. यंदा १४ जून रोजी गो. ब. देवल पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी ज्येष्ठ सिने-नाट्य अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

मागील तीन वर्षांपासून पुरस्कारांचे वितरण करण्यात आले नव्हते. नाट्य परिषदेची निवडणूक पार पडताच, कमी वेळात तातडीने नवनिर्वाचित नियामक मंडळाने जीवनगौरव पुरस्कार देण्याचे योजिले व पुरस्कार देण्यात आले. यंदाच्या वर्षी १४ जून २०२४ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, मनमाला टँक रोड, मांटुगा-माहीम, मुंबई येथे सायंकाळी ४ वाजता सर्व पुरस्कार दिले जाणार असल्याची माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली आहे.
नाट्य क्षेत्रात भरीव कार्य करणा-या नाट्यकर्मींचा सन्मान नाट्य परिषदेच्या वतीने दरवर्षी केला जातो.

यानिमित्ताने कलावंतांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त घेण्यात आलेला ‘नाट्यकलेचा जागर’ यातील सर्वोत्कृष्ट पारितोषिकप्राप्त एकांकिका, बालनाट्य, एकपात्री, नाट्यछटा, नाट्यसंगीत पद गायन, नाट्य अभिवाचन कार्यक्रम यानिमित्ताने सादर होणार आहेत. कलावंत व नाट्यरसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशांत दामले यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR