नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतात सध्या दुलीप ट्रॉफी खेळली जात आहे. नव्या फॉरमॅटमध्ये खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेत टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा लाडका समजल्या जाणा-या नवदीप सैनीने आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने दुलीप ट्रॉफीमध्ये चांगलीच कमाल केली आहे. नवदीप तीन वर्षांपासून भारतीय संघाबाहेर आहे. मात्र गंभीरच्या आगमनानंतर त्याचे नशीब बदलू शकते आणि त्याला टीम इंडियात स्थान मिळू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.
नवदीप सैनी दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया बी संघाकडून खेळत आहे. इंडिया ए विरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात नवदीपने प्रथम फलंदाजी आणि नंतर गोलंदाजीत शानदार कामगिरी केली. सैनीने प्रथम फलंदाजीत आपली कमाल दाखवली. त्याने मुशीर खानला १८१ धावांसाठी उत्तम साथ दिली. या दोघांमध्ये आठव्या विकेटसाठी २०५ धावांची भागिदारी झाली, ज्यामुळे नवदीपने १४४ चेंडूंत ८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५६ धावा केल्या. मुशीर आणि नवदीप यांच्या भागिदारीमुळे भारत बी संघाने ३२१ धावा फलकावर झळकावल्या.
फलंदाजीनंतर नवदीप सैनीने गोलंदाजीत भारत ए संघाच्या तीन मोठ्या फलंदाजांना तंबूत पाठवले. कर्णधार शुभमन गिल त्याचा पहिला बळी ठरला. नवदीप सैनीने २०२१ मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. आता या कामगिरीमुळे आणि गंभीरचा फेव्हरेट असल्यामुळे त्याचे भारतीय संघात पुनरागमन होईल असे मानले जात आहे.