22.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रअमरावतीमध्ये नवनीत राणा की बळवंत वानखेडे?

अमरावतीमध्ये नवनीत राणा की बळवंत वानखेडे?

‘प्रहार’ बिघडविणार भाजप किंवा काँग्रेसचा खेळ

अमरावती : अमरावती मतदारसंघातील दुहेरी लढत ‘प्रहार’च्या एन्ट्रीने तिरंगी झाली. जात प्रमाणपत्राचे प्रकरण आणि कार्यकर्ते आणि नेत्यांचा विरोध असताना सुद्धा भाजपने नवनीत राणा यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली. तर, महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसकडे गेल्याने त्यांनी बळवंत वानखेडे यांना उमेदवारी दिली. महायुतीचे घटक असलेले आमदार बच्चू कडू यांनी राणांच्या उमेदवारीला विरोध करत ‘प्रहार’कडून दिनेश बुब यांना उमेदवारी दिली होती.

त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्यावरून भाजपने मते मिळवली तर, दलित, मुस्लिम आणि कुणबी मतांची मोट बांधण्यासाठी काँग्रेसने धडपड केली. तसेच, ‘प्रहार’मुळे झालेली मतविभागणी भाजप की काँग्रेस, कुणाच्या पथ्यावर पडते, हे ४ जूनला कळणार आहे.

शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण केल्याप्रकरणी नवनीत राणा यांना अटक झाली होती. त्यामुळे राणा देशभर प्रसिद्ध झाल्या. याचा लाभ मिळविण्याचा प्रयत्न राणांनी निवडणुकीत केला. त्यासह जात प्रमाणपत्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राणांना उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी दिलासा दिला.

तसेच, भाजपमध्ये प्रवेश आणि उमेदवारी मिळाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचारसभा घेतल्या. त्यातून वातावरणनिर्मिती करण्याचा नवनीत राणा यांचा प्रयत्न होता. मात्र, अमरावतीतील भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांचा छुपा विरोध हा राणांसाठी अडचणीचा ठरला. शिंदेंच्या शिवसेनेतील नेते आनंदराव अडसूळ आणि त्यांचे सुपुत्र अभिजित अडसूळ यांनीही नवनीत राणांना विरोध केला होता. पण, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर अडसुळांनी अखेर आपली तलवार म्यान केली.

महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेनेने हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडला. येथून काँग्रेसने दर्यापूरचे आमदार बळवंत बानखेडे यांना उमेदवारी दिली. ग्रामपंचायत ते आमदार असा बळवंत वानखेडे यांचा राजकीय प्रवास आहे. वानखेडे यांनी काँग्रेसच्या परंपरेप्रमाणे प्रचार राबविला. काँग्रेस नेते, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी वानखेडे यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या. तसेच, काँग्रेसच्या नेत्या, आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह अन्य नेत्यांनी वानखेडे यांच्यासाठी मेहनत घेतली. त्यामुळे मेहनतीचे फळ मिळणार का? याची उत्सुकता लागली आहे.

बच्चू कडूंची नाराजी
खोक्यांवरून आरोप केल्यामुळे बच्चू कडू आधीच राणा दाम्पत्यावर नाराज होते. महायुतीकडून अमरावतीची जागा मिळण्यासाठी ‘प्रहार’ आग्रही होती. त्यातच भाजपने नवनीत राणांना उमेदवारी जाहीर केल्याने बच्चू कडू अधिकच आक्रमक झाले. बच्चू कडू यांनी शिवसेनेचे नेते, दिनेश बुब यांना अमरावतीच्या मैदानात उतरवत निवडणूक तिरंगी केली. दिनेश बुब यांच्यासाठी बच्चू कडू आणि आमदार राजकुमार पटेल यांनी प्रचाराची खिंड लढवली होती. त्यामुळे ‘प्रहार’ भाजप की काँग्रेस कुणाचा खेळ बिघडविणार, याची चर्चा अमरावती मतदारसंघात रंगली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR