मुंबई : प्रतिनिधी
कुर्ला येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली आहे. सध्या ते वैद्यकीय कारणामुळे जामिनावर तुरुंगाबाहेर आले आहेत.
शनिवारी दुपारी नवाब मलिक यांची प्रकृती बिघडल्याची माहिती त्यांची मुलगी सना मलिक हिने दिली. त्यानंतर त्यांना कुर्ला येथील रुग्णालयात आपत्कालीन कक्षात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. त्यांना श्वसनासंदर्भात त्रास होऊ लागल्यानंतर ते रुग्णालयात आले. मलिक यांच्यावर आता कुर्ला येथील क्रिटिकेअर सेंटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी २०२२ रोजी ईडीने अटक केली होती. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंधित प्रकरणात नवाब मलिक यांच्यावर अटकेची कारवाई झाली होती. डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी आर्थिक व्यवहार करणे तसेच त्याच्या बहिणीशी जमीन व्यवहार करण्यासंदर्भात ईडीकडून त्यांची चौकशी सुरू होती. काही महिन्यांपूर्वी वैद्यकीय कारणामुळे त्यांना जामीन मिळाला होता.