मुंबई : राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात सुनावणी सुरु आहे. यावर प्रतिक्रिया देताना राहुल नार्वेकांनी म्हटले की, उद्या आणि परवा या प्रकरणावर अंतिम सुनावणी घेण्यात येईल ३१ तारखेला हे प्रकरण क्लॉज फॉर ऑर्डर करण्यात येईल. त्यामुळे १५ फेब्रुवारीपर्यंत राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम निकाल देण्यात येणार असल्याचेही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले.
राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल देण्यास १५ दिवसांचा कालावधी वाढवून देण्यात आला. त्यामुळे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणानंतर लवकरच राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर देखील येत्या काही दिवसांत निकाल लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवारांकडून पक्ष आणि चिन्हावर देखील दावा करण्यात आला. तसेच या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात देखील सुनावणी सुरु आहे.
निवडणूक आयोगाचा निकाल कोणत्याही क्षणी…
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची लढाई ही सध्या निवडणूक आयोगात सुरु आहे. त्यामुळे पक्ष आणि चिन्हाचा निकाल हा आयोगात देखील प्रलंबित आहे. पण तो निकाल कोणत्याही क्षणी येण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा आणि चिन्ह कुणाचं यावर केंद्रीय निवडणूक आयोगात सुरु असलेली सुनावणी ८ डिसेंबरला पूर्ण झाली आहे. दोन्ही गटाच्या वकिलांच्या प्रतिवादानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल राखून ठेवला होता. मात्र अद्याप निवडणूक आयोगातील ऑर्डर येणे बाकी आहे. त्यामुळे आता लवकरच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळणार की शरद पवार गटाला मिळणार हे स्पष्ट होणार आहे.