मुंबई : प्रतिनिधी
अजित पवारांना महायुतीत घेऊन चूक झाली असे म्हणणार नाही. ती काळाची गरज होती. काळाची गरज असताना संधी प्राप्त होत असेल तर ती सोडायची नसते. एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांबाबत भाष्य केले आहे. तसेच त्यांनी अनेक राजकीय मुद्यांवर भाष्य केले आहे.
दरम्यान, राज्यात दोन वर्षांपूर्वी सत्तांतर झाले. शिवसेनेतून एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार भाजपसोबत सत्तेत आले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर काहीच महिन्यांत अजित पवार हे आपल्या सहकारी आमदारांसह महायुतीमध्ये सामील झाले. अजित पवार हे महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी आपल्या कामकाजामध्ये बदल केल्याचे म्हटले जात आहे.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना आमचे काही गुण लागणारच असे वक्तव्य केले. या त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. अजित पवार महायुतीत आल्याने वाद निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. अजित पवार हे गुलाबी झाले आणि भगवे झाले नाहीत यावरून फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला.
यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजित पवार सर्व आमदारांना सिद्धिविनायकाच्या दर्शनाला घेऊन गेले. गेली ४० वर्षे राजकारणात आहेत. त्यांना कधी असे पाहिले आहे का? अजित पवारांना महायुतीत घेऊन चूक झाली असे म्हणणार नाही. ती काळाची गरज होती. काळाची गरज असताना संधी प्राप्त होत असेल तर ती सोडायची नसते.
फडणवीस म्हणाले, अजित पवारांना महायुतीतून वगळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आम्ही सर्व एकत्रित आहोत. सोबत राहणार आहोत. लोकसभेला असलेली महायुती विधानसभेला देखील कायम असणार आहे. प्रत्येकाला वाटत असते की, आपला पक्ष मोठा व्हावा. अजित पवार सर्व आमदारांना सिद्धिविनायकाच्या दर्शनाला घेऊन गेले. गेली ४० वर्षे राजकारणात आहेत. त्यांना कधी असे पाहिले आहे का? त्यांना आमचे काही गुण लागणारच ना. त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही. एखाद्या गोष्टीत चूक झाली तर माफी मागणे ही संवेदनशीलता आहे. चूक होऊन देखील माफी न मागणे ही तानाशाही आहे. माफी मागून माणूस लहान होत नाही. अशा काही गोष्टी घडल्या तर माफी मागायला मागेपुढे बघणार नाही.