24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रपितृपक्षात वाटाघाटी, नवरात्रात निर्णय!

पितृपक्षात वाटाघाटी, नवरात्रात निर्णय!

आघाडी, महायुतीच्या जोर, बैठका सुरू २०१९ च्या जागा कायम राहणार, उर्वरित जागांचे वाटप विजयाच्या क्षमेतेवर

मुंबई : (प्रतिनिधी)

नोव्हेंबरच्या तिस-या आठवड्यात दोन टप्प्यात महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक होणार हे स्पष्ट झाले असून, दस-यापर्यंत जागावाटप पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी व सत्ताधारी महायुतीने बैठकांचे सत्र सुरू केले आहे. पितृपक्ष असला तरी प्राथमिक चर्चा पूर्ण करून नवरात्रीत त्यावर अंतिम निर्णय घेण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाची बैठक मुंबईतील सोफिटेल हॉटेलात आज झाली व या बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या सोबत चर्चा केली. काही अपवाद वगळता विद्यमान आमदारांच्या जागा त्या त्या पक्षांकडे राहतील याबाबत आघाडीत एकमत झाल्याचे समजते.

महाराष्ट्राच्या विद्यमान विधानसभेची मुदत २६ नोव्हेबरला समाप्त होणार असून तत्पूर्वी निवडणूक घ्यावी लागणार आहे. अन्यथा मुदत संपल्यावर राष्ट्रपती राजवट आणावी लागेल. त्यामुळे नोव्हेंबरच्या तिस-या आठवड्यात दोन टप्प्यात महाराष्ट्राची निवडणूक घेतली जाईल असे संकेत निवडणूक आयोगाने दिले आहेत. तसे झाले तर दस-यानंतर (१२ ऑक्टोबर) निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पितृपक्ष असला तरी सोमवारपासून जागावाटपाच्या वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीची बैठक आज मुंबईतील सोफिटेल हॉटेलात झाली.

२०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेने ५६, राष्ट्रवादीने ५४ व काँग्रेसने ४४ जागा ंिजकल्या होत्या. शिवसेना व राष्ट्रवादीचे दोन तृतीयांश आमदार जरी बाहेर पडून भाजपसोबत गेले असले तरी यातील बहुतांश जागा त्याच पक्षांकडे राहतील. मात्र जेथे सक्षम उमेदवार उपलब्ध नाहीत अशा काही जागांची अदलाबदल होऊ शकेल. लोकसभा निवडणुकीत कमी जागा लढवून ही राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला या निवडणुकीत विधानसभेच्या सर्वाधिक जागा लढवायला मिळतील, दुस-या क्रमांकावर शिवसेना(ठाकरे) व तिस-या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) असेल असे आघाडीच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

लोकसभा निवडणुकीत जागावाटपाची चर्चा सुरू असताना परस्पर उमेदवार जाहीर करण्याचे काही प्रकार झाले. यावेळी तसे होणार नाही, याची ग्वाही तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिली आहे. ज्या जागांबाबत दोनकिंवा तिन्ही पक्ष आग्रही असतील अशा जागांचा निर्णय पक्ष नेतृत्वाकडे सोपवण्यात येणार आहे. जागावाटपाची सर्व प्रक्रिया पाच ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करून पक्षीय पातळीवर उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर आघाडीत कोणतेही वाद नाहीत, काही जागांबाबत मतांतरं आहेत. पण आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निर्णय होईल असे ठाकरे गटाचे नेते खा.संजय राऊत यांनी सांगितले.

भाजपाच्या बैठकीनंतर महायुतीच्या वाटाघाटी !
महायुतीत जागावाटपाच्या अनौपचारिक चर्चा सुरू झाल्या असल्या तरी सलग बैठका भाजपच्या २३ व २४ सप्टेंबरला मुंबईत होणा-या मॅरेथॉन बैठकीनंतर सुरू होणार आहेत. भाजपाने १५० ते १६० जागा लढवण्याचा दृष्टीने तयारी केली असली तरी शिंदेंची शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी अनुक्रमे ९० व ८० जागांसाठी आग्रही आहे. भाजपचे विद्यमान आमदार असलेल्या जागा,एकनाथ शिंदे आणि अजितदादांसोबत असलेल्या आमदारांची संख्या जवळपास १९० च्या आसपास आहे. त्याचा निर्णय फारसा अवघड नाही. पण उर्वरित ९० ते १०० जागांचे वाटप सोपे असणार नाही.

विद्यमान जागांपेक्षा निवडून येण्याची क्षमता, लोकसभेतला स्ट्राईक रेट यावर जागावाटप व्हावे असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आग्रह आहे. तर शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या आम्हालाही मिळाल्या पाहिजेत असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे. महायुतीत २८८ पैकी १६८ जागांवर कोणताही वाद नसल्याचा दावा केला जात असला तरी उर्वरित जागांचा निर्णय सोप्पा नसेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर जागावाटपाचा निर्णय होईल असे समजते. दोन्ही बाजूच्या हलचाली बघता पितृपक्षात चर्चा झाल्या तरी निर्णयाचे घट नवरात्रातच बसतील अशी चिन्हं आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR