राफाह : गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धाला सर्वसामान्य नागरिकही बळी पडत आहेत. रविवारी दक्षिण गाझामधील राफाह शहरातील विस्थापित पॅलेस्टिनींच्या छावणीवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात जवळपास ४५ लोक ठार झाले. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ही दु:खद चूक मानली आहे. स्थानिक अधिका-यांनी ही माहिती दिली आहे.
हमाससोबत युद्ध लढणा-या इस्रायलला आंतरराष्ट्रीय स्तरावर टीकेला सामोरे जावे लागत आहे. अमेरिकेसारख्या त्यांच्या काही निकटवर्तीय देशांनीही नागरिकांच्या मृत्यूबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. जगतील सर्वोच्च न्यायालयातही त्याविरोधात आवाज उठवला जात असताना, आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करत असल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने इस्रायलला राफाहमधील हल्ले थांबवण्यास सांगितले. इस्रायली लष्कराने यापूर्वी सांगितले होते की, त्यांनी नागरिकांच्या मृत्यूची चौकशी सुरू केली आहे. गाझा आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रविवारी रात्रीचा हल्ला, जो युद्धातील सर्वात प्राणघातक हल्ल्यांपैकी एक असल्याचे दिसते. युद्धात मारल्या गेलेल्या पॅलेस्टिनींची संख्या ३६,००० पेक्षा जास्त झाली आहे.
आमच्याकडून दु:खद चूक झाली : नेतान्याहू
निर्दोष नागरिकांना इजा होऊ नये यासाठी आमचे सर्वोत्तम प्रयत्न असूनही, काल रात्री आमच्याकडून एक दु:खद चूक झाली असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इस्रायलच्या संसदेला संबोधित करताना सांगितले. ते म्हणाले, आम्ही घटनेचा तपास करत आहोत आणि हे आमचे धोरण असल्यामुळे निष्कर्ष काढू.
४५ लोकांचा मृत्यू
तेल अल-सुलतानच्या वायव्य भागात घटनास्थळी पोहोचलेले मोहम्मद अबुसा म्हणाले की, बचाव कर्मचा-यांनी खूप वाईट परिस्थितीत असलेल्या लोकांना बाहेर काढले. गाझा आरोग्य मंत्रालय आणि पॅलेस्टिनी रेड क्रिसेंट रेस्क्यू सर्व्हिसच्या मते, किमान ४५ लोक मारले गेले. मंत्रालयाने सांगितले की मृतांमध्ये किमान १२ महिला, आठ मुले आणि तीन प्रौढांचा समावेश आहे, तर इतर तीन मृतदेह गंभीरपणे जळाल्यामुळे ओळखू शकले नाहीत.