मुंबई : ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांचा ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध आहे. दोन्ही नेत्यांमध्ये अनेक दिवसांपासून शाब्दिक वाकयुद्ध रंगले आहे. दरम्यान, छगन भुजबळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटील यांच्यावर उपरोधिक टोलेबाजी केली. जरांगे यांच्या मनात रोज नवनवीन कल्पना येतात. त्यावर सरकारने लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी मी करतो असे भुजबळ यावेळी म्हणाले.
भुजबळ म्हणाले की, माझी भूमिका अशी आहे की, जरांगेचं आपण ऐकले पाहिजे आणि जे सोयरे म्हणजे पत्नीचे आई-वडील, व्याही आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिले पाहिजे. त्यांचे जी दुसरी मुले आहेत त्यांना देखील आरक्षण दिले पाहिजे. त्या मुला-मुलींचे दुसरे सासू-सासरे आणि त्यांच्या मुलांना देखील आरक्षण दिले पाहिजे. व्याह्यांचे व्याही, व्याह्यांचे व्याही या सगळ्यांना आरक्षण दिले पाहिजे, असे ते म्हणाले.
जरांगे यांनी आधी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी केली, त्यानंतर आता जरांगे आणि सरकारमध्ये सोयरे शब्दावरून मतभेद सुरू आहेत यावर भुजबळांनी जोरदार उपरोधक टीका केली .
आईला ओबीसी आरक्षण असेल तर मुलाल देखील ते मिळाले पाहिजे अशी नवीन मागणी जरांगे यांनी केली. यावर भुजबळांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.