मुंबई : शरद पवार गटाकडून नवे नाव, चिन्हासाठी चाचपणी सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने पक्षाचे चिन्ह आणि पक्ष अजित पवारांकडे सोपविल्यावर आता शरद पवार गटाकडून नव्या नावाचा विचार सुरू आहे.
शरद पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी, शरद स्वाभिमानी पक्ष या नावांचा पर्याय सध्या चाचपून पाहिला जातोय. तर कपबशी, सूर्यफूल, चष्मा, उगवता सूर्य या चिन्हांचा विचार सुरू आहे.
शरद पवार गटाला मंगळवारी दुपारपर्यंत नवीन पक्षाचे नाव निवडणूक आयोगाकडे द्यावे लागणार आहे. पक्षाचे चिन्ह नंतर दिले तरी चालेल, मात्र पक्षाचे नाव आज दुपारपर्यंत द्यावे लागणार आहे. दरम्यान, आज दुपारपर्यंत शरद पवार गटाकडून नाव आणि पक्षाचे चिन्ह सादर करण्यात येणार आहे. नव्या पक्षासाठी शरद पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी स्वाभिमानी पक्ष या नावांचा विचार आणि चर्चा सुरू आहे. तर चिन्हांसाठी कपबशी, सूर्यफूल, चष्मा, उगवता सूर्य या चिन्हांचा विचार सुरू आहे. काही वेळात या संदर्भात निर्णय समोर येईल.
निवडणुकीआधी शरद पवारांना मोठा धक्का
महाराष्ट्रातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच आहे, असा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला आहे. पक्ष आणि घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिले आहे, तर शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे. लोकसभा निवडणुकीआधी शरद पवार गटाला हा अतिशय मोठा धक्का आहे. कारण महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरेंच्या हातून याआधीच पक्ष गेला होता, त्यात आता शरद पवारांची देखील भर पडली आहे.