22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeसंपादकीय विशेषकर्करोगावर ‘नवा मसाला’

कर्करोगावर ‘नवा मसाला’

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), मद्रास येथील संशोधकांनी कर्करोगाच्या उपचारासाठी भारतीय मसाल्यांच्या वापराचे पेटंट घेतले आहे. सन २०२८ पर्यंत हे औषध बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. भारतीय मसाल्यापासून तयार केलेल्या नॅनोमेडिसिनमध्ये फुप्फुस, स्तन, आतडे, ग्रीवा, तोंड आणि थायरॉईड पेशींच्या विरुद्ध कर्करोगविरोधी कृती दिसून आली आहे. त्याचवेळी सामान्य पेशींसाठी ते सुरक्षित असल्याचेही दिसून आले आहे, असे सांगण्यात आले आहे. भारतीय मसाल्यांमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असल्याचे यापूर्वीही अनेक अभ्यासकांनी मांडले होते; पण आता आयआयटीच्या संशोधकांनी पेटंट घेतल्यास त्याला वैज्ञानिक अधिमान्यता मिळणार आहे.

जगभरात वैद्यकीय उपचारप्रणालींच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर संशोधने सुरू असूनही आणि त्याला विज्ञान-तंत्रज्ञानाची साथ लाभूनही अनेक दुर्धर व्याधींवरील रामबाण औषध शोधण्यामध्ये आपल्याला यश आलेले नाही. चार वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना महामारीने विषाणूजन्य आजारांची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली. त्यावेळी अँटी व्हायरल औषधांची निर्मिती करण्यातील मर्यादा लक्षात आल्या. तथापि, अशा आजारांचा मुकाबला करण्यासाठी किंवा ते नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध उपचारपद्धती उपलब्ध आहेत आणि त्या काळानुसार विकसित होत आहेत. अलीकडील काळात जगभरामध्ये कर्करोग, मधुमेह, हृदयविकार या प्रमुख व्याधींनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. यापैकी मधुमेह हा जीवनशैलीजन्य आजार असल्यामुळे त्याच्यावर नियंत्रण मिळवणे एकवेळ शक्य होऊ शकते; परंतु कर्करोगाचे वाढत चाललेले प्रमाण ही अत्यंत चिंतेची बाब ठरत आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणा-यांना कर्करोग होताना पाहायला मिळायचे. त्यामुळे या व्यसनांपासून लांब राहिल्यास कर्करोगाला दूर ठेवता येईल अशी धारणा होती. परंतु गेल्या दशकभरात अशा प्रकारच्या कोणत्याही व्यसनांचा गंधही नसलेल्या असंख्य जणांना केवळ कर्करोगाने गाठलेच नाही तर अनेकांचा बळीही गेला आहे. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजच्या मते, आजघडीला जगातील प्रत्येक सहावा मृत्यू कर्करोगामुळे होतो.

त्यामुळेच वैद्यकीय क्षेत्रातील संशोधकांपुढे या व्याधीने तगडे आव्हान उभे केले आहे. कोणत्याही प्रकारच्या आजारावर औषध तयार करताना शास्त्रज्ञांना अपरिमित प्रयत्न करावे लागतात. त्याच्या विविध स्तरांवर चाचण्या घ्याव्या लागतात. मुळात, विशिष्ट व्याधीवर विशिष्ट घटक प्रभावी ठरेल हे शोधणेच मुळात कठीण काम असते. यासाठी प्राचीन आरोग्यशास्त्राचा आधार घेतला जातो. आपल्याकडे वर्षानुवर्षे ‘आजीबाईचा बटवा’ नावाची संकल्पना अस्तित्वात आहे. त्यानुसार सर्दी, पडसे, खोकला, ताप, डोकेदुखी यांसारख्या किरकोळ आजारांवर घरामध्ये उपलब्ध असणा-या अन्नघटकांचा वापर करण्याविषयीचे मौलिक मार्गदर्शन केले जाते. यातील प्रत्येक गोष्टीला शास्त्रीय आधार आहे असे नाही. परंतु परंपरागत चालत आलेल्या ज्ञानातून आणि अनुभवातून या आहारघटकांची उपयुक्तता सिद्ध झाल्याचे दिसून आले आहे. उदाहरणच घ्यायचे झाल्यास, स्वयंपाकघरात असणारी हळद. शरीरातील एखाद्या भागाला खरचटण्यावर, कापण्यावर इलाज म्हणून वापरल्या जाणा-या हळदीचा वापर दुधात घालून घेतल्यास खोकल्यासारख्या आजारातही आराम मिळतो. हळदीमधील या औषधी गुणधर्मांना शास्त्रीय मान्यताही लाभली आहे. त्यामुळेच ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी हळदीच्या पेटंटसाठी दीर्घकाळ लढा दिला आणि तो जिंकून अत्यंत मोलाचे कार्य केले.

भारतात हजारो वर्षांपासून आयुर्वेद, युनानी किंवा अनेक भागातील जमाती, समाज घटकांतील पारंपरिक पद्धतीत हळदीप्रमाणेच अनेक वनौषधी, अन्नधान्यांचा वापर विविध आजारांवर केला जातो. पण त्याविषयी आजही मोठ्या प्रमाणावर अनभिज्ञता आहे. वैद्यकशास्त्रातील संशोधनामध्येही याबाबत फारसे मोलाचे काम केले जात नाही. या पार्श्वभूमीवर अलीकडेच समोर आलेली एक बातमी महत्त्वाची आहे. त्यानुसार इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), मद्रास येथील संशोधकांनी कर्करोगाच्या उपचारासाठी भारतीय मसाल्यांच्या वापराचे पेटंट घेतले आहे. सन २०२८पर्यंत हे औषध बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. भारतीय मसाल्यापासून तयार केलेल्या नॅनोमेडिसिनमध्ये संशोधकांना फुप्फुस, स्तन, आतडे, ग्रीवा, तोंड आणि थायरॉईड पेशींच्या विरुद्ध कर्करोगविरोधी कृती दिसून आली आहे. सामान्य पेशींमध्ये नॅनोमेडिसिन सुरक्षित असल्याचे आढळले. संशोधक सध्या सुरक्षा आणि किमतीची समस्या सोडवण्यावर काम करत आहेत. सध्याच्या कर्करोगाच्या औषधांमधील हे सर्वांत मोठे आव्हान आहे. मद्रास आयआयटीतील संशोधकांचा प्राण्यांवरील अभ्यास अलीकडेच यशस्वीरत्ीया पूर्ण झाला आहे, ही बाब सकारात्मक म्हणावी लागेल. आता हे औषध बाजारात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने क्लिनिकल चाचण्यांचे नियोजन केले जात आहे.

यासंदर्भात आयआयटी-मद्रास येथील रासायनिक अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक आर. नागराजन यांनी दिलेली माहिती मोलाची आहे. त्यानुसार भारतीय मसाल्याच्या तेलांचे औषधी फायदे शतकानुशतके ज्ञात असले, तरी त्यांच्या जैवउपलब्धतेमुळे त्यांचा वापर मर्यादित झाला आहे. कर्करोगाच्या पेशींशी सक्रिय घटक आणि त्यांच्या परस्परसंवादाच्या पद्धती ओळखण्यासाठी यांत्रिक अभ्यास महत्त्वाचा असून तो आम्ही प्रयोगशाळांमध्ये सुरू ठेवू. त्याचवेळी समांतर पद्धतीने आम्ही प्राण्यांच्या अभ्यासातील सकारात्मक परिणामांना क्लिनिकल चाचण्यांमध्ये त्वरित परावर्तित करण्यास आम्ही उत्सुक आहोत, असे ते सांगतात. तसेच आम्ही दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत हे औषध बाजारात आणण्याचा विचार करत आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. या संशोधनाचे महत्त्व म्हणजे पारंपरिक कर्करोग उपचारपद्धतीपेक्षा नॅनो ऑन्कोलॉजीचे फायदे अधिक आहेतच; पण सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे याचे दुष्परिणाम नाहीयेत. या संशोधन कार्यामध्ये सहभागी असणा-यांच्या मते, पेटंट केलेले भारतीय मसालेआधारित नॅनो-फॉर्म्युलेशन औषध अभ्यासांद्वारे कर्करोगाच्या अनेक सामान्य प्रकारांमध्ये प्रभावी सिद्ध झाले आहे.

भारतीय पारंपरिक आहार, त्यासाठी वापरले जाणारे पदार्थ यांचे आरोग्यशास्त्रीय महत्त्व कालातीत आहे. मसाल्यांचा वापर तर असंख्य वर्षांपासून भारतीय आहारात होत आला आहे. हळद, जिरे, मेथी, मोहरी, काळी मिरी, लवंग, दालचिनी, तमालपत्र, वेलदोडे यांसारख्या मसाल्यांच्या वापराशिवाय भारतीयांचा रोजचा आहार बनतच नाही. अलीकडील काळात त्यांच्या औषधी गुणांविषयी विविध संशोधनांमधून आणि अभ्यासातून माहिती उजागर होऊ लागली आहे, ही बाब आपल्या पूर्वजांच्या ज्ञानाविषयीचा अभिमान वाटणारी आहे. दुर्दैवाने पाश्चिमात्त्य आहारसंस्कृतीच्या रेट्यात भारतीय आहारपद्धतीचा प्रभाव कमी होत चालला आहे. वस्तुत:, पश्चिमी देशातून आलेल्या फास्टफूडच्या सेवनाचे आरोग्यावर असंख्य प्रतिकूल परिणाम होत आहेत. परंतु जाहिरातींच्या मा-यामुळे आणि प्रभावी विपणन कौशल्यामुळे हे पदार्थ आज महानगरांपासून गावाखेड्यांपर्यंत रोजच्या आहारसवयींचा भाग बनत आहेत. या फोफावलेल्या फास्टफूड कल्चरमध्ये भारतीय आहारांचे महत्त्व किती मोठे आहे, हे अशा संशोधनांमुळे जाणवून देण्यास मदत होणार आहे.

अर्थात यासंदर्भातील पुढील संशोधनाचे टप्पे आणि पेटंट मिळवण्याची प्रक्रिया पार पडणे आवश्यक आहे. तसेच क्लिनिकल चाचण्या यशस्वी होणे गरजेचे आहे. कारण त्याखेरीज हे औषध खुल्या बाजारात आणण्याची परवानगी मिळणार नाही. तसेच हे अस्सल भारतीय औषध बाजारात येण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर त्याच्या किमतीबाबतही शासनाने सकारात्मक भूमिका घ्यायला हवी. जेणेकरून त्याचा लाभ सर्वांना घेता येईल. हळदीचा लढा असो किंवा आयआयटी चेन्नईच्या संशोधकांना मिळालेले यश असो यातून पुन:पुन्हा पारंपरिक भारतीय आहारपद्धतीचे अनन्यसाधारण महत्त्व समोर येत आहे. त्यामुळे येणा-या काळात त्यावर अधिकाधिक संशोधन होण्याची गरज आहे. विज्ञानाच्या युगात कोणत्याही गोष्टीला शास्त्रीय परीक्षणातून मिळालेल्या यशाचे कोंदण लाभल्याखेरीज त्याला लोकमान्यता मिळत नाही.

– मंजिरी फडके,
आहारतज्ज्ञ

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR