23.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रनिलेश लंके यांनी घेतली बाळासाहेब थोरात यांची भेट

निलेश लंके यांनी घेतली बाळासाहेब थोरात यांची भेट

नगर : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निलेश लंके यांनी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची संगमनेर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

संगमनेर येथील ‘सुदर्शन’ निवासस्थानी निलेश लंके यांनी शनिवारी रात्री आमदार थोरात यांची भेट घेतली. निलेश लंके म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात

यांनी सुसंस्कारित राजकारण केले आहे. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो आहे. राजकारणामध्ये ज्या नेत्यांबद्दल सर्वांना आदर आणि आत्मीयता आहे, त्यामध्ये बाळासाहेब थोरात आहेत, असे लंके म्हणाले.

२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर विधानमंडळात कामकाज करताना त्यांनी सातत्याने मदत केली. सातत्याने विधानसभेत नवीन आमदारांना मदत व मार्गदर्शन करणारे आमदार बाळासाहेब थोरात हे लोकप्रिय नेते आहेत. त्यांचा आशीर्वाद हा राजकारणात आणि समाजकारणात नव्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने आज त्यांच्या भेटीसाठी आल्याचे लंके यांनी सांगितले.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, निलेश लंके यांची आमदारकीची यशस्वी आणि लोकप्रिय कारकीर्द राहिली आहे. सामान्य जनतेसाठी झटणारा- पळणारा कार्यकर्ता अशी त्यांची राज्यभर ओळख निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन सातत्याने काम करणारे नेतृत्व आहे. सर्वसामान्य नागरिक आणि युवकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे मोठे नाते आहे. नगर दक्षिणमध्ये समोरचा उमेदवार मोठा आहे.

मात्र हा लहान कार्यकर्ता असला तरी गुणी आहे. ही निवडणूक श्रीमंत विरुद्ध गरिबाची लढाई होणार असून येणा-या लोकसभा निवडणुकीत आमदार निलेश लंके यांचे मोठे यश राहणार आहे. हे यश महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रीय पातळीवरील इंडिया आघाडीचे राहणार असल्याचेही थोरात यांनी सांगितले. नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके नक्कीच विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR