पुणे : महाराष्ट्रात सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, आमच्यात मुख्यमंत्री होण्यासाठी कोणालाही घाई नाही. जागा वाटपातही कोणाचाही आग्रह नाही. ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री ही भावना आहे, पण प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे त्यावरून निर्णय होतो, असे स्पष्ट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
सध्या आम्ही कोण कोणती जागा जिंकू शकतो, यावर आमची चर्चा सुरु आहे. जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा आमचा प्रयत्न आहे. अजित पवार आणि आमच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार नाही. भाजपची संघटना पूर्णपणे अजित पवारांच्या पाठीशी उभी राहिल. बावनकुळे यांनी आज पुण्यातील मानाच्या गणपतीचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नागपूर येथे झालेल्या अपघाताबद्दल बावनकुळे म्हणाले, माझा मुलगा असो किंवा, सामान्य मुलगा असो नियमाने सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. जे नियम सर्वांसाठी आहे ते सर्व नियम या घटनेत लावले जातील. मी या घटनेबद्दल जास्त बोलणार नाही, अन्यथा पोलिसांवर दडपण आल्यासारखं होईल, या घटनेत कोणीही जखमी नाही.
भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीमध्ये नाव समाविष्ट केल्याने किरीट सोमय्या यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली, त्याबद्दल बावनकुळे म्हणाले, सोमय्या आमचे वरिष्ठ नेते आहेत, पण पक्षाचे नेतृत्व आणि कोर कमिटी जे ठरवते ती जबाबदारी दिली जाते. ही जबाबदारी देताना संबंधितांना त्याबद्दल कोणी विचारत नाही. सोमय्या हे कधीच नाराज नाहीत. महायुतीचे सरकार आले तरच केंद्र आणि राज्य सरकारच्या सगळ्या योजना सुरू राहतील. उलट जेथे काँग्रेसचे सरकार येते तेथील योजना बंद पडतात हे जनतेला माहिती आहे. लाडकी बहीण योजना महिलांच्या मागे खंबीरपणे उभी आहे. कुठल्या ही बहिणीला विचारा, बहीण आता महायुतीला मत देणार आहे. २०१९ मध्ये माझे तिकीट कमी झाले तरी मी पक्षात थांबलो, थोडा संयम थोडी सबुरी पाहिजे असे मी म्हणालो माझे आवाहन आहे की थोडे थांबा सगळ्यांना संधी मिळेल, असे पक्ष सोडून जाणा-यांबद्दल बावनकुळे म्हणाले.