नागपूर : बीडमध्ये सरपंचांची झालेली हत्या हा गंभीर प्रकारच आहे. मात्र या घटनेवरून होत असलेले राजकारण दुर्दैवी आहे. या प्रकरणातून राजकारणाऐवजी समाजात सुधार व्हावा यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. चौकशी पूर्ण झाल्यावर कुठल्याही दोषीला सोडणार नाही, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नागपुरात ते रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
कुठल्याही मुद्यावरून सार्वजनिक ठिकाणी मोर्चे काढण्याचा सर्वांना अधिकार आहे. बीडच्या प्रकरणात सरकार आणि पोलिस पुर्ण क्षमतेने कारवाई करत आहेत. या प्रकरणात कुणालाही वाचविण्याचा प्रयत्न झालेला नाही. जर कुणी तसा प्रकार केला तरी कुणालाही वाचवू देणार नाही. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल. जे दादागिरी करतात किंवा दहशत निर्माण करून जनतेत जरब बसविण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर वचक बसविण्याचा प्रयत्न आहे. पोलिसांची योग्य कारवाई सुरू आहे.
अंजली दमानिया यांची जी काही तक्रार असेल ती त्यांनी पोलिसांकडे करावी. त्यावर योग्य पावले उचलली जातील, असे फडणवीस यांनी सांगितले.आरोपी कुठेही गेले असतील व कुणीही मदत केली असेल तर कारवाई होत आहे. या प्रकरणात आरोपींना मदत करणा-यांनाही सोडणार नाही व काही जण चौकशीच्या फे-यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची नीट चौकशी होऊ द्यावी. चौकशी पूर्ण झाल्यावर कुठल्याही दोषीला सोडणार नाही हा आमचा शब्द आहे असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.