पाथरी : पाथरी तालुक्यात शिवसेनेला पुनर्जीवित करणारे शिवसेना नेते सईद खान यांना महायुती आणि शिवसेना पक्षाकडून उमेदवारी द्या. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेतो असे म्हणत शेकडो शिवसैनिक, पदाधिकारी आणि महिलांनी पाथरी विधानसभा पक्ष निरीक्षक आनंद जाधव यांच्याकडे मागणी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून येत्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे अनेक ठिकाणी पक्ष निरीक्षकांची निवड करण्यात आली आहे. पाथरी विधानसभेसाठी निवड करण्यात आलेले पक्ष निरीक्षक आनंद जाधव यांनी आज प्रत्यक्ष शिवसेना कार्यालयाला भेट देऊन सर्वसामान्य लोकांसह शिवसैनिकांचे मत जाणून घेण्याचे प्रयत्न केले. यावेळी उपस्थित सर्वांनीच एक मुखाने सईद खान यांच्या नावाला पाठिंबा देत निवडून आणण्याची जबाबदारी घेतली. यावेळी सर्वांचे म्हणणे ऐकून घेत जाधव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
संपूर्ण पाथरी मतदार संघातून आलेल्या जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, महिला, पदाधिकारी, शिवसैनिक या सर्वांच्या वतीने शिवसेना नेते सईद खान यांना उमेदवारी मिळण्यासाठी लेखाजोखा मुद्देसूद मांडत सईद खान हे पाथरी विधानसभेसाठी सक्षम उमेदवार असल्याचे अधोरेखित केले. यावेळी मानवत, सोनपेठ, पाथरी व ग्रामीण भागातील अनेक ज्येष्ठ व युवा कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांच्या भावनेची दखल घेऊन निश्चितच उमेदवारी देतील अशी आशा यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.