रत्नागिरी : प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कोकणात मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे रत्नागिरीतील नेते राजन साळवी ठाकरे गटाची साथ सोडणार असल्याची माहिती समोर आली. यावर मी ठाकरेंवर नाराज नसून, भविष्यात पदाधिका-यांशी चर्चा करून मार्गक्रमण करणार असल्याचे सूचक विधान ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी केले आहे.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला येत्या काही दिवसांमध्ये कोकणात मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा होत आहे. ठाकरे गटाचे रत्नागिरीतील नेते राजन साळवी हे भाजपा किंवा शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर जाऊ शकतात, अशी माहिती समोर आली यावर ठाकरे गटाचे नेते आणि राजापूर विधानसभेचे माजी आमदार राजन साळवी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ते नाराज नसल्याचे सांगितले, पण पदाधिका-यांशी चर्चा करून भविष्यात मार्गक्रमण करणार असल्याचेही राजन साळवी यांनी सांगितले आहे.
राजन साळवी यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांनी राजापूर विधानसभेत सलग तीनवेळा प्रतिनिधित्व केले आहे. पण यंदा मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर वरिष्ठांनी दखल घेतली नसल्याने राजन साळवी नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पुढे बोलताना साळवी म्हणाले की, ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक म्हणून माझी ओळख आहे. पण २०२४ च्या पराभवाला आम्हाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे त्या पराभवाचे दु:ख, खंत आणि वेदना माझ्यासकट माझ्या मतदारसंघातील सामान्य जनतेला आहे. पराभवाची खंत असताना भविष्यातही शिवसेना मार्गक्रमण करत आहे.
तसेच, मला तुमच्या सर्वांच्या माध्यमातून समजत आहे की, मी नाराज आहे. मी भाजपाच्या, शिंदे गटाच्या वाटेवर आहे. पण तसे काहीही नाही. माझे माझ्या मतदारसंघातील कार्यपद्धतीवर मार्गक्रमण सुरू आहे. त्यामुळे मी नाराज असल्याच्या किंवा अशा त-हेच्या बातम्या या अफवा आहेत. हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार आहे. त्याबद्दल माझ्या मनात कोणत्याही प्रकारची शंका नाही, असे ठाकरे गटाचे कोकणातील नेते राजन साळवी यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.