नाशिक : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे ओबीसी एल्गार सभेच्या माध्यमातून राज्यात ठिकठिकाणी मेळावे घेत आहेत. एकीकडे ओबीसी समाजाची बाजू मांडताना भुजबळ राजकीय अडचणीत असताना, आता भुजबळ यांच्या कुटुंबियांवर आर्थिक अडचण निर्माण झाली. याचे कारण म्हणजे नाशिक जिल्हा सहकारी बँकेकडून थकीत कर्ज प्रकरणी भुजबळ कुटुंबियांना नोटीस बजावण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्हा सहकारी बँक थकीत कर्जामुळे आर्थिक अडचणीत आली आहे. थकीत कर्ज वसुलीसाठी बँकेकडून विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.
मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील भुजबळ कुटुंबियांच्या मालकीच्या आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड या साखर कारखान्याला थकीत कर्ज प्रकरणी नोटीस देण्यात आली. एकूण ५१ कोटी ६६ लाखांच्या थकबाकी वसुलीसाठी बँक प्रशासनाकडून कारखान्याचे संचालक असलेल्या मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र माजी आमदार पंकज भुजबळ आणि पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांना नोटीस बजावली.
आर्मस्ट्राँगकडील थकीत रक्कम वसुलीसाठी जिल्हा बँकेच्या प्राधिकृत अधिका-यांनी सरफेशी कायद्यांतर्गत कारखाना कार्यस्थळावर जाऊन नोटीस चिटकवली आहे.