नागपूर : गेल्या चार पाच दिवसांपासून आकाशात दाटलेले ढगांचे आच्छादन शनिवारी ब-यापैकी निवळले. त्यामुळे किमान तापमानात मोठ्या फरकाने घसरण झाली व हलक्या थंडीची जाणीव झाली. आता पुन्हा पा-यात घसरण होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे. कडाक्याची नसली तरी हलक्या थंडीचा प्रभाव पुढचे दहा दिवस जाणवत राहिल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
नागपूरसह विदर्भातील हा संपूर्ण आठवडा ढगाळ वातावरणात गेला. आकाश पूर्ण ढगांनी व्यापले राहिले. ढगांमुळे रात्रीचा पारा मोठ्या फरकाने उसळला. गेले पाच दिवस किमान तापमान १५ ते १७ अंशाच्या दरम्यान म्हणजे सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशाने अधिक होते. दुसरीकडे दिवसाचा पारा मात्र २६ ते २५ अंशापर्यंत घसरला होता. त्यामुळे दिवसा गारव्याची अनुभूती व रात्री उबदारपणा जाणवत राहिला. शनिवारी २४ तासांत नागपूरचा रात्रीचा पारा ३.१ अंशाने घसरला व १४ अंशाची नोंद झाली, जी सरासरीत आहे.
त्यामुळे पहाटेच्या वेळी काहीशा गारव्याची अनुभूती जाणवली. विदर्भातील इतर जिल्ह्यातही रात्रीचा पारा घसरला असून बहुतेक शहरात तापमान १४ अंशावर आले आहे. अमरावती व यवतमाळ तेवढे १५ अंशावर आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यापुढचे काही दिवस पारा सरासरी किंवा त्यापेक्षा खाली जावून थंडी वाढण्याची शक्यता आहे. हे कदाचित थंडीचे शेवटचे आवर्तन असेल, असाही अंदाज आहे.
यामुळे वाढेल थंडी
– गुजरातपासून राजस्थानपर्यंत समुद्रसपाटीपासून एक किमी. उंचीपर्यंत कमी दाबाचा तिरपा आस तयार झाला.
– उत्तर भारतात एकापाठोपाठ मार्गस्थ होणारे पश्चिमी प्रकोप आणि अरबी समुद्रातून नैरूक्त दिशेकडून येणा-या आर्द्रतेचा पुरवठ्यामुळे तेथे सध्या होणारा पाऊस, बर्फवृष्टी व थंडी आहे.
– ओरिसावरील उच्चं दाब क्षेत्र आता राजस्थान मध्य प्रदेशकडे सरकले आहे.
– त्यामुळे घड्याळकाटा दिशेने वहन होणा-या प्रत्यावर्ती चक्रीय वा-यामुळे उत्तर भारतातील थंडी, बिहार व झारखंडमार्गे पूर्वेकडून महाराष्ट्रात खेचल्या जाण्याची शक्यता आहे.
– या प्रभावाने आता पुढील १० दिवसात थंडीची शक्यता निर्माण झाली आहे.
– ही थंडी नागपूरसह विदर्भात अधिक जाणविण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.