मुंबई : प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून, आता महायुतीत बंडखोरी वाढली आहे. कागलचे भाजप नेते समरजितसिंह घाटगे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकरही शरद पवार गटात दाखल होणार आहेत. त्यांच्यासोबत अजित पवारांनी उमेदवारी जाहीर केलेले फलटणचे विद्यमान आमदार दीपक चव्हाणही शरद पवारांना साथ देणार आहेत. १४ ऑक्टोबर रोजी त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे.
इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात शरद पवारांनी फलटणमधील १४ तारखेच्या मेळाव्याची माहिती देत रामराजेंच्या प्रवेशाचे संकेत दिले होते. त्यातच आता रामराजेंचाही तुतारी हाती घेण्याचा निर्णय झाल्याची खात्रीशीर माहिती आहे. राजराजे नाईक निंबाळकर यांच्यासोबत अजित पवार यांचे सातारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकरही तुतारी हातात घेणार आहेत. १४ तारखेला फलटणमध्ये जाहीर कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडणार आहे. महायुतीत आल्यानंतर देण्यात आलेली आश्वासने पाळली न गेल्याने निंबाळकर कुटुंबीय अजित पवार यांची साथ सोडली जात असल्याची सूत्रांची माहिती आहे.
रामराजे नाईक निंबाळकर यांच्या एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी महायुतीत होणारा अन्याय आणि त्रासाचा दाखला देत तुतारी हाती घेण्याची भूमिका मांडली होती. मात्र, त्यावेळी निंबाळकरांनी कोणताही निर्णय जाहीर केला नव्हता. मात्र, आता सर्वांचाच निर्णय पक्का झाल्याची माहिती आहे. त्यामुळे अजित पवार यांना आता फलटण विधानसभेसाठी नव्याने उमेदवार शोधावा लागणार आहे.
रामराजे लवकरच पवारांची भेट घेणार
पक्ष प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर रामराजे नाईक निंबाळकर लवकरच अजित पवारांची भेट घेणार आहेत. मात्र, या भेटीपूर्वीच त्यांचे राष्ट्रवादीतील पक्षप्रवेश निश्चित झाल्याचे समजते. त्यामुळे १४ ऑक्टोबरला फलटणला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.