23.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रआषाढी वारीसाठी आता एसटी बस थेट गावात

आषाढी वारीसाठी आता एसटी बस थेट गावात

५ हजार ज्यादा बसची सोय, ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास उपलब्ध होणार बस

मुंबई : प्रतिनिधी
एकीकडे पावसाची दमदार सुरुवात झाल्याने बळीराजा सुखावला असून पेरणीच्या कामाची तयारी करत आहे. पेरणीनंतर वारकरी, शेतकरी विठुरायाच्या जपनामात मग्न होणार आहेत. दुसरीकडे पंढरीच्या वारीची तयारीही प्रशासनाने सुरू केली आहे. आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपूरला जाणा-या भाविक प्रवाशांसाठी एसटीने यात्राकाळात ५ हजार विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे. ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास बस थेट गावात उपलब्ध होणार आहे. त्यासाठी जवळच्या आगारात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आषाढी वारीसाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने पंढरीला जात असतात. भाविक भक्तांची मागणी लक्षात घेऊन त्यांना पंढरीला जाण्यासाठी थेट गावातून सोय उपलब्ध करून देण्याची भूमिका एसटी महामंडळाने घेतली आहे. त्यासाठी राज्यातील कोणत्याही गावातून किमान ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी तशी एकत्रित मागणी केल्यास थेट गावातून पंढरीला जाण्यासाठी बसची सोय होणार आहे. त्यामुळे भाविकांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. पावसाळ््यात भाविकांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. याचा विचार करून एसटीची सोय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

सालाबाद प्रमाणे श्री श्रेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक-प्रवाशी येतात. अनेक प्रवाशी स्वत:च्या खाजगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालखीं बरोबर चालत दिंडीने येतात, या प्रवाशांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. ४० पेक्षा जास्त भाविक प्रवाशांची संख्या असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. अर्थात या प्रवासात देखील ७५ वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सुट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत. दरम्यान, मागील वर्षी एसटीने आषाढी यात्रेनिमित्त ४२४५ विशेष बसेस सोडल्या होत्या. याव्दारे यात्रा काळात १८ लाख, ३० हजार ९३४ भाविक प्रवाशांची सुखरूप ने-आण एसटीने केली होती.

फुकट्या प्रवाशांना लगाम
यात्रा काळात गर्दीचा फायदा घेऊन तिकीट न काढणे, वाहकाकडून तिकीट मागून न घेणे अशाप्रकारे फुकट प्रवास करू इच्छिणा-या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने पंढरपूरला जाणा-या विविध मार्गांवर १२ ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचे नियोजन केले आहे, अशा फुकट्या प्रवाशांना अटकाव करण्यासाठी एसटीचे २०० सुरक्षा कर्मचारी व अधिकारी यात्रा काळात २४ तास नजर ठेवून असणार आहेत.

वाहतूक नियोजनासाठी मदत
एकादशीच्या दिवशी लाखो भाविक प्रवासी आपल्या गावाकडे मार्गस्थ होतात, अशा वेळी रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन प्रवासाचा खोळंबा होतो. यंदा स्थानिक पोलिस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून ३६ पेक्षा जास्त वाहतूक नियंत्रक व सुरक्षा रक्षक वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काम करणार आहेत. यासाठी पोलिस प्रशासनाला एसटीची मदत होणार आहे.

४ तात्पुरती बसस्थानके
पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये, यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR