21.5 C
Latur
Saturday, February 24, 2024
Homeमहाराष्ट्रजरांगेंना उत्तर देण्यासाठी ओबीसी समाजही मुंबईत धडकणार

जरांगेंना उत्तर देण्यासाठी ओबीसी समाजही मुंबईत धडकणार

मुंबई : मनोज जरांगे यांच्या दबाव तंत्राला उत्तर म्हणून, आता ओबीसी समाजाने देखील मुंबईकडे कूच करण्याची पूर्वतयारी सुरू केली आहे. मेळावे, सभा जनजागृती या माध्यमातून ओबीसी समाजाला जागृत करायचे काम सुरू झाल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सांगितले. जरांगे यांनी सरकारवर दबाव तयार करण्यापेक्षा, सरकार काय करू शकते व काय करू शकत नाही यांचा विचार करून सरकारला वेळ द्यायला पाहिजे. त्यानुसार आपली भूमिका ठरवायला पाहिजे, असा सल्ला बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे यांना दिला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्याकडून मुंबईत आमरण उपोषण केले जाणार आहे. यासाठी लाखो मराठा आंदोलकांना घेऊन मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये आणि जरांगे यांची मागणी मान्य करू नये यासाठी ओबीसी समाज देखील आक्रमक झाले आहेत. एवढंच नाही तर ओबीसी समाज देखील आता आपल्या मागण्यांसाठी मुंबईकडे कूच करणार असल्याचा थेट इशारा ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी दिला आहे. मनोज जरांगे यांच्या दबावतंत्राला उत्तर म्हणून मुंबईत आंदोलन करणार असल्याचे देखील तायवाडे म्हणाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

बबनराव तायवाडे यांच्याप्रमाणे प्रकाश शेंडगे यांनी सुद्धा मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनावरून सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारने मराठा समाजासाठी काढलेला जीआर हा ओबीसी समाजावर अन्याय करणारा असून, याच जीआरच्या आधारे ५४ लाख कुणबी नोंदी आढळल्या असल्याचे शेंडगे म्हणाले आहेत. तर, एवढे लोक ओबीसीमध्ये येत असतील, तर हा ओबीसीवर अन्याय होत असल्याचे सांगत हा जीआर रद्द करावा अशी मागणी शेंडगे यांनी केली आहे. सोबतच, नव्याने देण्यात आलेल्या कुणबी नोंदी रद्द कराव्या, या मागणीसाठी राज्यभरातील ओबीसी समाज २६ तारखेला मुंबईत मोर्चा काढणार असल्याचा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR