सॅन फ्रान्सिस्को : सॅन फ्रान्सिस्कोहून उड्डाण घेत असताना टायर निखळल्याने जपानला जाणारे युनायटेड एअरलाइन्सचे जेटलाइनर गुरुवारी लॉस एंजेलिसमध्ये उतरले. या विमानात २३५ प्रवासी होते तसेच १४ क्रू मेंबर होते. विमानाच्या डाव्या बाजूच्या मुख्य लँडिंग गियर असेंब्लीवरील सहा टायरपैकी एक टायर निखळला. हे टायर खाली पार्किंगच्या जागेत असलेल्या कारवर पडल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे.
विमानाने उड्डाण घेताच काही सेकंदात विमानाचा एक टायर निसटल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. टायर सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कर्मचा-यांच्या पार्किंगमध्ये पडला. यामुळे कारची मागच्या बाजूचा चक्काचूर झाला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
एका निवेदनात, एअरलाइनने म्हटले आहे की २००२ मध्ये डिझाईन केलेले हे विमान निखळलेल्या किंवा खराब झालेल्या टायरसह सुरक्षितपणे उतरण्यासाठी डिझाइन केले होते. या घटनेची पुढील चौकशी फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनकडून केली जाईल, असे असोसिएटेड प्रेसने म्हटले आहे.
बोईंग ७७७-२००चे टायर विमानाने उड्डाण केल्यानंतर काही सेकंदात निखळले तेव्हाचा क्षण व्हिडिओ फुटेजमध्ये कॅप्चर करण्यात आला. क्रूला मलबा साफ करण्याची परवानगी देण्यासाठी धावपट्टी थोडावेळ बंद करण्यात आली होती.