23.6 C
Latur
Friday, October 4, 2024
Homeसोलापूरवचनपूर्ती सोहळ्यासाठी ४० हजार महिला लाभार्थी आणण्याचे अधिका-यांना टार्गेट

वचनपूर्ती सोहळ्यासाठी ४० हजार महिला लाभार्थी आणण्याचे अधिका-यांना टार्गेट

सोलापूर : सोलापूर शहरातील होम मैदानावर मंगळवारी (ता. ८) दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा ठरला आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून ३५ ते ४० हजार महिला लाभार्थी घेवून येण्यासाठी ४०० बसगाड्या भाड्याने घेतल्या जाणार आहेत. लाभार्थी आणायची जबाबदारी प्रत्येक तहसीलदारांवर सोपविण्यात आली असून त्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, मंडलाधिकारी, गटविकास अधिकारी यांना कामाला लावण्यात आल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्याच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी (ता. ४) पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, मुख्यमंत्री कार्यालयाचे संतोष यादव, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपजिल्हाधिकारी अंजली मरोड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर, जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अभय भोसले, सहायक पोलिस आयुक्त सुधीर खिरडकर, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार, तहसीलदार श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते.

सोहळ्यासाठी जिल्हाभरातून येणा-या महिला लाभार्थ्यांची व्यवस्था चांगली व्हावी, प्रत्येक तालुक्यातून येणा-या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करावी, प्रत्येक बसमध्ये एक तलाठी असेल ते सर्व महिलांना व मैदानापर्यंत घेऊन येणे व कार्यक्रम झाल्यानंतर त्यांच्या गावी सोडतील. प्रत्येक बसमध्ये पाणी व अन्य सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात, कार्यक्रमाच्या ठिकाणी पाणी, मोबाईल टॉयलेट व आरोग्य पथक असावे, कार्यक्रमाचे व्यासपीठ, विद्युत पुरवठ्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे, प्रोटोकॉलप्रमाणे व्यासपीठ तयार करावे अशा सूचना जिल्हाधिका-यांनी यावेळी दिल्या. कार्यक्रमासाठी मोठी गर्दी व्हावी, यासाठी प्रशासन तयारीला लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR