मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेचा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. उद्धव ठाकरे यांना चांगल्या डॉक्टरच्या उपचाराची गरज आहे असा हल्ला चढवतानाच एकनाथ शिंदेंना रुसूबाई रुसू गावात जाऊन बसू म्हणता? मग तुम्ही सारखे सारखं लंडनला का जाता? असा संतप्त सवाल रामदास कदम यांनी विचारला आहे.
रामदास कदम यांनी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवत त्यांच्या भाषणाचे पोस्टमार्टेमच केले. उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. त्यांना चांगल्या डॉक्टरची आवश्यकता आहे. त्यांना नियतीने धडा शिकवला आहे. त्यांनी या निवडणुकीत ९० उमेदवार उभे केले होते. फक्त उमेदवार २० निवडून आले. तेही राहतील की नाही अशी शंका निर्माण झाली आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांना वैफल्य आले आहे. त्यातूनच त्यांची बडबड सुरू आहे असा हल्लाबोलच रामदास कदम यांनी केला आहे.
लंडनला का जाता?
रुसूबाई रुसू आणि गावात जाऊन बसू असे उद्धव ठाकरे हे एकनााथ शिंदे यांना उद्देशून म्हणाले. एकनाथ शिंदे शेतक-यांचा मुलगा आहेत. त्यामुळे ते गावाला जातात, शेती करतात. पण उद्धवजी आपण लंडनला कशासाठी जाता? महाराष्ट्रातील मिठाईचे खोके गोळा करून घेऊ आणि लंडनला बसू असे काही आहे का तुमचे? असा सवाल रामदास कदम यांनी केला.
उद्धव ठाकरेंना वर्षावर जायची घाई होती
एकनाथ शिंदे सक्षम आहेत. त्यांनी ८० उमेदवार उभे केले आणि ६० आमदार निवडून आणले. त्यामुळेच आता उद्धव ठाकरेंनी थांबायला हवे. आत्मपरीक्षण केलं पाहिजे. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बेईमानी केली. शिवसेनाप्रमुखांनी शेवटपर्यंत कोणतेही पद घेतले नाही. शिवसेनाप्रमुख मुख्यमंत्री होऊ शकले नसते? त्यांनी मनोहर जोशींना लोकसभेचे अध्यक्ष केले. बाळासाहेब लोकसभेचे अध्यक्ष होऊ शकले नसते? झाले असते ना. पण त्यांनी रिमोट कंट्रोल आपल्या हाती ठेवला. उद्धव ठाकरे स्वार्थी आहेत. त्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यांना वर्षा बंगल्यावर जाऊन बसण्याची घाई होती. म्हणून शिवसेना फुटली. कशाला एकनाथ शिंदेंना दोष देता. तुमचं आत्मपरीक्षण करा. तुम्ही काय केले? तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी केली. त्यांचे नाव घेण्याचा अधिकार आहे का तुम्हाला? एकनाथ शिंदेंनी कर्तृत्व सिद्ध केले आहे. जनतेने शिक्कामोर्तब केले की शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असेही रामदास कदम म्हणाले.