कोल्हापूर : प्रतिनिधी
यंदाच्या निवडणुकीत लाडकी बहीण योजनाच महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. यावरून महायुतीने १५०० वरून २१०० रुपये करण्याचे व मविआने ३००० रुपये करण्याचे दावे केले आहेत. अशातच कोल्हापुरात तर वेगळ्याच धुंदीत लाडक्या बहीण योजनेवरून तारे तोडले जात आहेत.
महाडिकांच्या ‘१५०० रुपये घेणा-या महिलांचे फोटो काढा व आम्हाला पाठवा’या वक्तव्यावरून सुरू झालेला वाद, ३००० रुपये वसूल करेपर्यंतच थांबलेला नाही तर महिला तेल, मीठ, मसाला असा खच्चून ५०० रुपयांतच संसार करू शकतात असा दावा महायुतीच्या महिला नेत्याने केला आहे.
महाडिक यांनी ज्या महिला लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतात आणि काँग्रेसच्या सभेत, रॅलीत दिसतात त्यांचे फोटो काढा आणि आम्हाला पाठवा, आम्ही व्यवस्था करू, अशी धमकी दिली होती. हे थोडे की काय म्हणून कोल्हापूर भाजपच्या महिला उपाध्यक्ष मेघाराणी जाधव यांनी एका सभेत १५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर ३००० वसूल करणार, असे वादग्रस्त विधान केले आहे. त्याचाही पुढे जात जयसिंगपूर शहराच्या माजी नगराध्यक्ष नीता दांडेकर-माने यांनी ५०० रुपयांपेक्षा जास्त महिन्याचा खर्च जाऊच शकत नाही असा दावा केला आहे.
दांडेकर-माने यांच्या वक्तव्याचा व्हीडीओ व्हायरल होत आहे. तेलाचा डबा २२०० रुपये झाला म्हणतायत. कोणती बाई महिन्याला १० किलोचा डबा संपविते असा सवाल करत चार माणसांना महिन्याला खच्चून दीड किलो तेल लागते. महागाई वाढून वाढून अशी किती वाढली? साखर, गूळ, तेल, डाळ, तूप, लोणी हे सगळे तसेच भाजीपाल्याची नासाडी झाल्याने भाजीपाला महाग झाला आहे. महागाई वाढली असली तरी तेल, मीठ, मसाला, भाजी या सर्वांसाठी महिन्याचा खर्च खच्चून ५०० रुपयांच्यावर जाणार नाही, वर रेशन फ्री, असे या नेत्या म्हणाल्या.
आपल्या भावाने दिलेत ना एक्स्ट्रा आणि १००० रुपये. सगळे मिळून पाचशे खर्च झाले तरी १००० रुपये उरतात. ही गोष्ट समजावून सांगितली पाहिजे, असे या नीता दांडेकर-माने म्हणाल्या. नीता दांडेकर या हातकणंगले मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अशोक माने यांच्या सून आहेत. माने हे जनसुराज्य पक्षाचे भाजप पुरस्कृत उमेदवार आहेत