22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeधाराशिवमतमोजणी पुर्वीच लागले ओमराजे निंबाळकर यांचे विजयाचे बॅनर

मतमोजणी पुर्वीच लागले ओमराजे निंबाळकर यांचे विजयाचे बॅनर

सुभाष कदम
धाराशिव : काय तो नेता…काय ते कार्यकर्ते…काय तो आत्मविश्वास…मतमोजणीच्या आदल्याच दिवशी विजयी झाल्याचे बॅनर संपूर्ण जिल्ह्यात झळकले. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेनेचे (ठाकरे) उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या बाबतीत घडलेला हा प्रकार आहे. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (दि. ४) मे रोजी सकाळी आठ वाजता सुरू झाली. आपलाच उमेदवार घासून नव्हे तर ठासून येणार, हा दांडगा आत्मविश्वास शिवसेनेच्या प्रत्येक कार्यर्त्यांना होता. त्यामुळेच धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक शहरात, तसेच गावोगावी, चौकाचौकात मतमोजणीच्या आदल्याच दिवशी म्हणजे सोमवारी महाविकास आघाडीचे (शिवसेनेचे) उमेदवार विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, अशा आशयाचे बॅनर झळकू लागले. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत घेतलेली मतांची लीड शेवटच्या फेरीपर्यंत कमी न होता वाढतच गेली.

धाराशिव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर व महायुतीच्या (राष्ट्रवादी अजित पवार) उमेदवार अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्यात थेट दुरंगी लढत झाली. धाराशिव मतदारसंघात परंडाचे आमदार तथा महायुतीचेच पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत, तुळजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आ. राणाजगजितसिंह पाटील, उमरगा-लोहारामध्ये शिवसेनेचे (शिंदे गट) आ. ज्ञानराज चौगुले, औसामध्ये भाजपाचे आ. अभिमन्यू पवार, बार्शीमध्ये भाजपाचे आ. राजेंद्र राऊत, तीनवेळा आमदार व राज्यमंत्री राहिलेले बसवराज पाटील, माजीमंत्री मधुकरराव चव्हाण यांचे सुपूत्र सुनिल चव्हाण आदी दिग्गज नेतेमंडळी महायुतीत असल्याने प्रचाराच्या सुरूवातीला महायुतीच्या अर्चनाताई पाटील यांचे पारडे कागदावर तरी जड वाटत होते. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. महाविकास आघाडीकडून उमेदवार असलेले ओमराजे व धाराशिव-कळंबचे आ. कैलास पाटील या दोघांनीच खिंड लढवली होती. त्यांच्या जोडीला माजी आ. ज्ञानेश्वर पाटील, माजी आ. राहुल मोटे हे होते.

प्रचाराच्या दुस-या टप्यात मात्र निवडणुकीचा अंदाज येत गेला. जनतेमध्ये मोदी सरकार व भाजप विषयी प्रचंड नाराजी असल्याचे जाणवत गेले. मराठा आरक्षणाचा मुद्दा मराठायोद्धा जरांगे पाटील यांनी तेवत ठेवला होता. केंद्र व राज्य सरकारने मराठा समाजाला वेढ्यात काढण्याचे काम केले, अशी भावना मराठा समाजाची झाली होती. याशिवाय मुस्लिम समाज कधी नव्हे इतका भाजप विरोधात एक झाला होता. गेल्या तीन वर्षापासून जिल्ह्यात नगदी पिक समजल्या जाणा-या सोयाबीनचा भाव साडेचार हजाराच्या पुढे सरकत नव्हता. त्यामुळे मोदी सरकारविषयी शेतक-यांमध्ये प्रचंड चिड निर्माण झाली होती. तसेच महाराष्ट्रातील पक्ष फोडाफोडीचे राजकारण बुद्धीजीवी वर्गालाही पटले नव्हते. याचाच परिपाक म्हणून धाराशिव मतदारसंघात मतदारांनी भाजप सरकारच्या विरोधात व उमेदवारांकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता हिरीरीने मतदान केले. त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांना २ लाखापेक्षा जास्तीची मतांची लीड मिळत गेली.

शिवसेनेच्या कार्यर्त्यांना मतदान कशा पद्धतीने झाले, याचा अंदाज आलेला होता. त्यामुळेच त्यांचा आत्मविश्वास दृढ होत गेला. गावोगावच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणीच्या आदल्याच दिवशी ओमराजे निंबाळकर विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन…अशा आशयाचे बॅनर लावले गेले. निवडून तर ओमराजेच येणार, फक्त लीड किती मिळणार, असे कार्यकर्ते बोलत होते. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये पहायला मिळालेला दांडगा आत्मविश्वास जिल्ह्याने कधी अनुभवला नव्हता, हे मात्र खरे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR