22.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeअंतरराष्ट्रीयबांगलादेशमधील हिंदूंवर कडव्या ‘जेएमबी’चे हल्ले

बांगलादेशमधील हिंदूंवर कडव्या ‘जेएमबी’चे हल्ले

ढाक्का : वृत्तसंस्था
बांगला देशातील हिंदूंवर सतत हल्ले वाढत आहेत. हिंदू सरकारी कर्मचा-यांचे जबरदस्तीने राजीनामे घेतले गेले आहेत. मंदिरांवर हल्ले होत आहेत. हंगामी पंतप्रधान मोहम्मद यूनुस हे सर्व मुकाट्याने पाहत आहेत. कट्टरपथी शक्तीपुढे ते पूर्ण हतबल झाले आहेत किंवा त्यांना पाठिंबा आहे. इस्कॉन मंदिराचे चिन्मय दास प्रभु यांच्यासह अनेक हिंदू नेत्यांना तुरुंगात डांबले गेले आहे. चिन्मय दास प्रभु यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावण्यात आला आहे.

इस्कॉन मंदिराशी संबंधित सर्व बँक खाती सील करण्यात आली. दुसरीकडे बांगलादेशातील हिंदूंवर हल्ले वाढले आहेत. हे हल्ले जमात-उल-मुजाहिदीन ही बांगलादेशातील दहशतवादी संघटना घडवून आणत असल्याचा अहवाल इंटेलिजेन्सकडून देण्यात आला. या सर्व प्रकरणात भारत सरकारने गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

१९७१ मध्ये बांगलादेश भारताच्या मदतीमुळे स्वतंत्र राष्ट्र झाला. त्यावेळी बांगलादेशात हिंदूंची लोकसंख्या २२ टक्के होती. परंतु मागील पाच दशकांपासून हिंदूंवर अत्याचार वाढत आहेत. त्यामुळे त्यांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. बांगलादेशात आता केवळ ८ टक्के हिंदू आहेत.

शेख हसीना सरकार गेल्यानंतर कारागृहातून ७०० कैदी पळून गेले होते. त्यातील अनेक जण जेएमबी संघटनेचे अतिरेकी आहेत. आता हे अतिरेकी रस्त्यांवर हिंदूंवर हल्ले करत आहेत. तसेच कारागृहात असलेले हजारो दहशतवादी कारागृहात येणा-या हिंदूंवर हल्ले करत आहेत.

‘जेएमबी’ आहे काय?
१९९८ मध्ये पालमपूरमधील अब्दुल रहमान याने या दशतवादी संघटनेची सुरुवात केली. ही संघटना २००१ मध्ये चर्चेत आली. त्यावेळी दिनाजपूर जिल्ह्यात बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. या संघटनेच्या आठ दहशतवाद्यांनाही अटक करण्यात आली. फेब्रुवारी २००३ मध्ये या संघटनेने दिनाजपूर जिल्ह्यातील छोटो गुरगोला भागात सात बॉम्बस्फोट केल्याचे उघड झाले होते. बांगलादेश सरकारने २००५ मध्ये या संघटनेवर बंदी आणली.

त्यामुळे त्यावर्षी ऑगस्ट महिन्यात या संघटनेने ३०० ठिकाणांवर ५०० बॉम्बस्फोट घडवून आणले. २०१६ मध्ये या संघटनेने अनेक ठिकाणी सार्वजनिक हत्याकांड घडवून आणले. भारताने या संघटनेवर २०१९ मध्ये बंदी आणली. भारतासोबत मलेशिया, इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलियासह इतर काही देशांनी या संघटनेस दहशतवादी संघटनेच्या यादीत टाकले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR