18.8 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरराज्यात फक्त ‘खान की बाण’चे राजकारण

राज्यात फक्त ‘खान की बाण’चे राजकारण

ओवेसींचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

छ. संभाजीनगर : लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रात पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिलला होणार आहे. दुसरीकडे एमआयएमने मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार प्रचार सुरू केला आहे. पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये मंगळवारी जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी ‘राज्याच्या राजकारणात २० वर्षांपासून हे बोलत होते की खान पाहिजे की बाण’असे म्हणत उद्धव ठाकरे व शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. पुढील महिन्यात १३ मे रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे.

ओवेसींनी यावेळी बोलताना चंद्रकांत खैरेंवर टीका केली. ते म्हणतात, आम्ही हजारो कोटी घेतले. जरा तरी लाज वाटू द्या. तुम्ही भाजपामुळे निवडणूक जिंकून आलात. उद्या जर मोदी तुमच्याकडे बघून फक्त हसले, तरी तुम्ही औरंगाबाद विकायला तयार व्हाल. पण एक काम तर औरंगाबादकरांनी केले. त्यांनी या माणसाला मुस्लिमांविषयी बोलायला भाग पाडले. सगळे भाऊ-भाऊ आहेत असं बोलायला भाग पाडलं’’, असं ओवेसी म्हणाले.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमधील लढतीवर भाष्य करताना ओवेसींनी सर्वच पक्षांवर खोचक टीका केली. आता दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, एक भाजपा आणि अर्धी काँग्रेस असे साडेपाचजण इम्तियाज जलील यांच्याविरोधात लढायला आले आहेत, असे ओवेसी म्हणाले.

ही आग आपण शांत करू
ठाकरे गटाला मिळालेल्या मशालीच्या चिन्हावरून असदुद्दीन ओवेसींनी टोला लगावला. २० वर्षांपासून हे बोलत होते की खान पाहिजे की बाण. आता यांचे काय निवडणूक चिन्ह आहे? जास्त फेकाफेकी केली तर हेच होतं. प्रत्येक निवडणुकीत खान-बाण केलं, मग निसर्गही म्हणाला घ्या. सगळं निघून गेलं. यांच्या हाती मशाल आली. पण मशालीपासून सावध राहा. मशालीत आग आहे. या आगीला संपवायचे आहे. हे या आगीने घरे जाळू इच्छितात. ही आग आपण विझविणार आहोत’’, असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा
एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी सोमवारी झालेल्या जाहीर सभेत यवतमाळ येथे आनंदराज आंबेडकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर मंगळवारी झालेल्या जाहीर सभेत त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला. इम्तियाज जलील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आहेत, असे ओवेसी यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR