छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
मराठवाड्यात पावसाने हैदोस घातला असून हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यात मुसळधार पावसानं दाणादाण उडाली आहे. पूरपरिस्थिती ओढावल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मराठवाड्याला जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मागील ६ तासांत अरबी समुद्रावर असणारा कमी दाबाचा पट्टा आता नैऋत्येकडे सरकला आहे. त्यामुळे विदर्भासह मराठवाड्यावर पुढील १२ तास कमी दाब राहणार असून मुसळधार पावसाची शक्यता आहे.
रविवारी रात्रीपासून जिल्ह्यात तुफान पाऊस होत असून आज सकाळपासून पावसाचा जोर वाढलेलाच आहे. धरण परिसरात मुसळधार पाऊस झाल्यानं जायकवाडी धरण भरलं आहे.
सात जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट ?
हवामान विभागानं जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला असून छत्रपती संभाजीनगरला पावसाला ऑरेंज अलर्ट दिला आहे. यावेळी वादळी वा-यांसह व वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोसाट्याचा वा-यासह मुसळधार पाऊस राहणार असून वा-याचा वेग ३० ते ४० किमी प्रतितास राहण्याची शक्यता आहे.