27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्र...नाहीतर राणांचे जातवैधता प्रमाणपत्र प्रकरण बाहेर काढीन

…नाहीतर राणांचे जातवैधता प्रमाणपत्र प्रकरण बाहेर काढीन

अमरावती : प्रतिनिधी
राज्यपालपदासाठी ८ दिवस वाट पाहणार अन्यथा नवनीत राणा यांचे जातवैधता प्रमाणपत्राचे प्रकरण बाहेर काढणार असा इशारा माजी मंत्री आनंदराव अडसूळ यांनी दिला आहे. त्यामुळे माजी खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच अडसूळ यांच्या या भूमिकेमुळे महायुतीतही धूसफूस सुरू होऊ शकते.

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. भारतीय जनता पक्षाने राज्यपाल पदाचे आश्वासने दिले होते, मात्र ते पाळले नसल्याचाही आरोप अडसूळ यांनी केला आहे. त्यामुळेच अडसूळ यांनी आता ही आक्रमक भूमिका घेत आठ दिवस वाट पाहू असे जाहीर केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबद्दल जो निर्णय दिला होता तो अयोग्य होता, असा अडसूळ यांचा आरोप आहे. त्यामुळे नवनीत राणा यांना दिलेल्या जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार असा इशाराही माजी मंत्री आनंदराव अडसूळ यांनी दिला आहे. त्यामुळे माजी खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्यातील अमरावतील लोकसभा मतदार संघात महायुतीत भाजपातर्फे नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्याविरोधात महायुतीतील शिवसेनेचे आनंदराव अडसूळ होते. दुसरीकडे प्रहारचे बच्चू कडू यांनी आपला उमेदवार जाहीर केला होता. नवनीत राणाविरुद्ध दोन्ही नेते माघार घेण्याच्या तयारीत नव्हते. परंतु अखेर आनंदराव अडसूळ यांनी माघार घेतली. अमित शाह यांच्यासोबत झालेल्या त्या बैठकीनंतर अडसूळ यांनी माघार घेतली. त्या बैठकीत अमित शाह यांनी अडसूळ यांना राज्यपाल करण्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, असा दावा अडसूळ यांनी केला होता.

मला देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल करण्याचे सांगितले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मला बोलवले. त्यांनी अमरावतीची जागा भाजपला हवी असल्याचे सांगितले. महायुतीचा घटक पक्ष असल्यामुळे मी माघार घेतलीय त्यावेळी अमित शाह यांनी मला राज्यपाल करण्याचा शब्द दिला. बैठकीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुध्दा उपस्थित होते’ असे आनंदराव अडसूळ यांनी सांगितले.

भाजपाने दिलेला शब्द पाळावा
मात्र आता लोकसभा निवडणुका होऊन बराच कालावधी उलटला आहे. मात्र आता देशातील विविध राज्यातील राज्यपालांची एक नवी लिस्ट निघाली, त्यामध्ये माझे नाव नाही. तरी मी संयम ठेवला, दोन दिवसांनी भाजप नेत्यांना जाऊन भेटलो. लोकसभा निवडणुकीवेळी जे आश्वासन देण्यात आले होते, त्याची आठवण करून दिली, असे अडसूळ यांनी सांगितले.

नवनीत राणांमुळे खूप नुकसान
राज्यपाल पदासाठी अजून आठ दिवस वाट बघतो, नाहीतर नवनीत राणा यांच जात वैधता प्रमाणपत्राचं प्रकरण पुन्हा बाहेर काढेन, असा इशारा त्यांनी दिला. नवनीत राणा यांच्या मुळे माझे खूप नुकसान झाले आहे. तेव्हा (लोकसभेत) मला उमेदवारी दिली असती तर मी निवडुन आलो असतो आणि मंत्री देखील झालो असतो, असेही अडसूळ म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR