संभल : २४ नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशातील संभलमधील जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार झाला होता. या हिंसाचारामागे आंतरराष्ट्रीय दहशतवादी कट असल्याचा संशय पोलिसांना असून संभलमधून बेपत्ता झालेल्या व पाकिस्तान, अफगाणिस्तानात पळून गेलेल्या गुन्हेगारांच्या पोलिस दफ्तरातील जुन्या फाईल्स तपासल्या जात आहेत.
हिंसाचार झाला तेथे सापडलेले पाकिस्तान मेड काडतूस हे या संशयामागचे मुख्य कारण ठरले होते. कुख्यात माफिया दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानात आहे. संभलचा मूळ रहिवासी शारीक साठा हा सध्या दाऊद टोळीसोबत आहे. शारीक सध्या दुबईत असून हवालाच्या माध्यमातून टेरर फंडिंगचे काम तो करतो. शारीक हा एकेकाळी वाहने चोरायचा. एकट्या दिल्ली परिसरात त्याच्याविरोधात १०० हून अधिक गुन्हे आहेत. २०१८ मध्ये शारीक अटकेनंतर ३ महिन्यांनी जामिनावर सुटला आणि कायमचा फरार झाला. १९९८ पासून संभलमधून १०० हून अधिक तरुण बेपत्ता झाले आहेत. त्यातील सईद अख्तर, शर्जील अख्तर आणि उस्मान हे अल-कायदा, हरकत-उल-मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांशी संबंधित आहेत. अदनान १९९९ मध्ये पाकिस्तानात गेला होता. संभल हिंसाचारात शारीकसह या सगळ्यांनी भूमिका बजावल्याचा पोलिसांचा कयास आहे, त्या दिशेने तपासही सुरू आहे.
जागतिक दहशतवादी सनाऊल मूळ संभलचाच
– सनाऊल हक ऊर्फ असीम उमर हा मूळ संभलचाच. संभलमधील अनेक युवक त्याने नादाला लावले.
– लादेनचा खास अयमान अल-जवाहिरीने सनाऊलला २०१४ मध्ये अल कायदा इंडियन स्टेटचा प्रमुख म्हणून नेमले.
– अमेरिकेने ३० जून २०१६ रोजी सनाऊलला जागतिक दहशतवादी घोषित केले.
– २०१९ मध्ये अफगाणिस्तानात एका अमेरिकन हवाई हल्ल्यात तो मारला गेला.